पंढरपुरात विठुरायाचं दर्शन ३ दिवस बंद! विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींबाबत मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मूर्तींच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून रासायनिक लेपन करण्यात येणार असल्याने २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष दर्शन बंद राहणार आहे.

पंढरपूर : महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुढील तीन दिवस भाविकांना विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून विशेष रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
विठुरायाच्या मूर्तीच्या चरणांची मोठ्या प्रमाणात झीज
वर्षानुवर्षे लाखो भाविक विठ्ठलाच्या चरणांवर मस्तक टेकवून दर्शन घेतात. सातत्याने होणारा स्पर्श, अभिषेक, तापमानातील बदल आणि आर्द्रता यांमुळे मूर्तीची झीज होत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
भारतीय पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ २२ सप्टेंबर रोजी रात्री शेजारतीनंतर मूर्तींच्या सफाईचे काम सुरू करणार आहेत. त्यानंतर २३ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष लेपन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
झिजलेल्या भागांची दुरुस्ती कशी होणार?
विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींचे संवर्धन करताना ज्या ठिकाणी दगडाची झीज झाली आहे, त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या दगडाचा चुरा वापरून झिजलेला भाग भरून काढण्यात येणार आहे.
विशेषतः विठ्ठलाच्या चरणांवर अधिक काम करावे लागणार आहे. झिजलेले भाग भरून काढल्यानंतर मूर्तींवर संरक्षक रासायनिक लेप लावण्यात येईल. या प्रक्रियेमुळे मूर्तींची पुढील झीज रोखण्यास आणि त्यांचे दीर्घकालीन संवर्धन करण्यास मदत होणार आहे.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे तीन महिने विलंब
मूर्तींच्या संवर्धनासाठी आषाढी एकादशीपूर्वीच रासायनिक लेपन करण्याचे नियोजन होते. मात्र, या प्रक्रियेला काही भाविकांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे नियोजित कामाला जवळपास तीन महिने विलंब झाला.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने रासायनिक लेपन प्रक्रियेला परवानगी दिल्याने संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाकडून कामाची तयारी करण्यात आली आहे.
मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी रात्री शेजारतीनंतर पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ संवर्धनाच्या कामाला सुरुवात करणार आहेत.
वज्रलेप म्हणजे नेमकं काय?
मूर्तींची झीज रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रक्रियेला पारंपरिक भाषेत 'वज्रलेप' असे म्हटले जाते. मूर्तीच्या दगडातील तडे भरणे, झिजलेल्या भागांचे संवर्धन करणे आणि भविष्यातील नुकसान टाळणे, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाचे निवृत्त उपसंचालक आणि रसायनतज्ज्ञ विलास पुनीराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधुनिक संवर्धन प्रक्रियेत इपॉक्सी राळ, दगडाची भुकटी आणि सिलिकॉन आधारित संरक्षक पदार्थांचा वापर केला जातो.
दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी घ्यावी नोंद
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मूर्तींच्या संवर्धनासाठी पुढील तीन दिवस प्रत्यक्ष दर्शन बंद राहणार असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी.