नोकरी गेली, वाढला आर्थिक ताण; पिंपरीत कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ

सारांश : पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडी परिसरात आर्थिक अडचणींमुळे एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई यांचा मृत्यू झाला असून पत्नी आणि मुलगी यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत आर्थिक विवंचनेचा उल्लेख असून, मोबाईल, ऑनलाइन व्यवहार आणि इतर पुराव्यांच्या आधारे संत तुकारामनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

AI Generated

Pune Crime News Image

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात आर्थिक अडचणींमुळे एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई (50) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी शिल्जा पिल्लाई (45) आणि मुलगी पूर्णिमा पिल्लाई (19) यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्लाई कुटुंब मूळचे केरळमधील आहे. ते पिंपरीतील मोरवाडी भागातील करिश्मा ग्लोरी हाऊसिंग सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. शुक्रवारी रात्री त्यांनी घरात विषारी धूर तयार करून तसेच विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शनिवारी सकाळी शिल्जा पिल्लाई या शाळेत कामावर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने सोसायटीतील रहिवाशांनी घरात जाऊन पाहिले. त्यावेळी तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी विनोद पिल्लाई यांना मृत घोषित केले. पत्नी आणि मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत.

नोकरी गेल्यानंतर वाढल्या अडचणी

विनोद पिल्लाई यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते आणि ते एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी नोकरी सोडल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडू लागली. त्यांनी नेहरूनगरमधील स्वतःचे घर विकले आणि मोरवाडीत भाड्याच्या घरात राहायला गेले. तसेच केरळमध्ये सुरू असलेल्या घराच्या बांधकामामुळेही त्यांच्यावर आर्थिक ताण वाढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनास्थळी सापडली चिठ्ठी

पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये, "आर्थिक अडचणींमुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये," असे लिहिले आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोबाईल आणि ऑनलाइन व्यवहारांची तपासणी

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तिघांचेही मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. त्यामधील सर्च हिस्ट्री, आर्थिक व्यवहार, कर्जाची माहिती आणि ऑनलाइन खरेदीची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासात विनोद पिल्लाई यांनी एक रासायनिक पदार्थ ऑनलाइन मागवल्याचे समोर आले आहे. त्याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांचा तपास सुरू

घटनास्थळावरून काही महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पत्नी आणि मुलगी उपचारानंतर जबाब देऊ शकतील, त्यानंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे संत तुकारामनगर पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.



Inline Article Ad 728x90