खासगी वाहनांवरील ‘पोलीस’ पाटी आता चालणार नाही; राज्यभर कारवाईचे आदेश
राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’ किंवा ‘POLICE’ अशी पाटी, स्टिकर किंवा अधिकृत ओळख दर्शविणारे चिन्ह लावून फिरणाऱ्यांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना वाहतूक विभागाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी वाहनांवर अनधिकृतपणे ‘पोलीस’ असा उल्लेख आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ आणि मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत कारवाई केली जाणार असून वाहनधारकांनी अशा पाट्या तातडीने काढून टाकाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’ किंवा ‘POLICE’ अशी पाटी लावून फिरणाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि वाहतूक शाखांना अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच राज्यभर अशा वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
राज्यात अनेक खासगी चारचाकी आणि दुचाकींवर ‘पोलीस’ अशी पाटी किंवा स्टिकर लावलेले दिसतात. अशा वाहनांची तपासणी अनेकदा टाळली जाते. याचा गैरफायदा घेत काहीजण बेकायदेशीर कामे, अवैध वस्तूंची वाहतूक किंवा इतर चुकीच्या कामांसाठी अशा वाहनांचा वापर करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे आता अशा वाहनांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाहतूक विभागाच्या निर्देशानुसार, खासगी वाहनांवर परवानगीशिवाय ‘पोलीस’, ‘POLICE’ किंवा सरकारी ओळख दाखवणारी कोणतीही पाटी किंवा चिन्ह लावणे नियमांच्या विरोधात आहे. अशा वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ आणि मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडही भरावा लागू शकतो.
यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालय यांनी खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी लावण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशा प्रकारामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ शकते आणि सरकारी ओळखीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. यानंतर संबंधित यंत्रणांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फक्त अधिकृत पोलीस किंवा शासकीय वाहनांनाच अशी ओळख वापरण्याची परवानगी असते. मात्र, काहीजण स्वतःच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी लावून फिरतात. त्यामुळे तपासणीदरम्यान गोंधळ निर्माण होतो आणि कायद्याची अंमलबजावणी करताना अडचणी येतात.
त्यामुळे ज्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘POLICE’ किंवा अशाच प्रकारचे स्टिकर किंवा पाट्या लावलेल्या आहेत, त्यांनी त्या तातडीने काढून टाकाव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. अन्यथा तपासणीदरम्यान संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे सरकारी ओळखीचा गैरवापर रोखण्यास मदत होईल, तसेच वाहतूक तपासणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.