कल्याणीनगर पोर्शे प्रकरणात मोठा दिलासा; रक्तनमुने बदल प्रकरणातील शिपाईला जामीन

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपातील ससून रुग्णालयातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर या बहुचर्चित प्रकरणातील सर्व 10 आरोपींना जामीन मिळाला असून, मुख्य खटल्याची सुनावणी मात्र न्यायालयात सुरू राहणार आहे.

पोर्शे प्रकरण Image

पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील आरोपी आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या आदेशानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व 10 आरोपींना जामीन मिळाला आहे.

मे 2024 मध्ये पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अपघातावेळी कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आणि इतर तपास यंत्रणांनी विविध अंगांनी तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप समोर आला. आरोपीच्या रक्ताऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात ससून रुग्णालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले.

या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल नामदेव घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर पुराव्यांमध्ये फेरफार, न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने अतुल घटकांबळे यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यापूर्वी या प्रकरणातील इतर आरोपींनाही न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आता या खटल्यातील सर्व आरोपी जामिनावर आहेत.

या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

दरम्यान, सर्व आरोपींना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयीन सुनावणी, सादर होणारे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे लागणार आहे.

Inline Article Ad 728x90