प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! मुलाने दाखवला राजेंद्र शिंदेंचा आरोपींसोबतचा व्हिडिओ; अटकेची मागणी
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात नवा व्हिडिओ समोर आला आहे. मुलगा राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत राजेंद्र शिंदे हे हत्येतील आरोपींसोबत दिसत असल्याचा दावा केला. तसेच मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आणला. या व्हिडिओमध्ये ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे हे हत्याप्रकरणातील आरोपींसोबत दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
राम पूर्णेकर यांच्या दाव्यानुसार, व्हिडिओमध्ये राजेंद्र शिंदे यांच्यासह नितेश पवार, पप्या शिंदे आणि संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली हे आरोपी दिसत आहेत. हेल्मेट घातलेली व्यक्ती राजेंद्र शिंदे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, व्हिडिओतील व्यक्तींची ओळख आणि त्यांचा हत्येशी संबंध याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासातून स्पष्ट झालेला नाही.
२६ दिवस उलटूनही न्याय मिळाला नाही; मुलाचा संताप
वडिलांच्या हत्येला २६ दिवस उलटूनही न्याय मिळाला नसल्याची खंत राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आश्वासन दिले, मात्र मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. दोघांना २४ तासांत अटक न झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे.
राजेंद्र शिंदेंची सातवेळा चौकशी
या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना सातवेळा चौकशीसाठी बोलावल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही राम पूर्णेकर यांनी काही व्हिडिओ समोर आणले होते. त्यामध्ये आरोपी निखिल यादव हा राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत बंदुकीचा सराव करत असल्याचा दावा करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
२९ सप्टेंबरला कार्यालयात घुसून हत्या
२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ठाण्यातील मानपाडा परिसरातील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येच्या कटात सहभागी असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी यापूर्वी हे आरोप फेटाळले आहेत.
आता नव्याने समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील कोणती कारवाई करणार आणि पूर्णेकर कुटुंबीयांच्या आरोपांबाबत तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.