Pune Railway : दिवाळीत पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! ३६ अतिरिक्त डबे आणि ९९ विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे विभागाने विशेष नियोजन केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी स्थानकांवरून ९९ विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दानापूरकडे जाणाऱ्या गाड्यांना एका दिवसात ३६ अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात आले आहेत.

Pune Railway Diwali Special Trains 2026

Pune Railway : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची मोठी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. याअंतर्गत हडपसर आणि खडकी रेल्वे स्थानकांवरून एकूण ९९ विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांची संख्या वाढल्याने विविध गाड्यांना अतिरिक्त जनरल डबेही जोडण्यात आले आहेत. दिवाळीच्या काळात पुण्यातून उत्तर भारत, विदर्भ आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांची व्यवस्था हडपसर आणि खडकी स्थानकांवर केली आहे.

हडपसर स्थानकावरून ७८ विशेष रेल्वे फेऱ्या

रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, हडपसर रेल्वे स्थानकावरून एकूण ७८ विशेष फेऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये गोरखपूरसाठी ३२, नागपूरसाठी २३, गाझीपूर सिटीसाठी १४, प्रयागराजसाठी ५ आणि लातूरसाठी ४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आह. या विशेष फेऱ्यांमुळे दिवाळीसाठी उत्तर प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.

खडकी स्थानकावरून २१ विशेष फेऱ्या

हडपसरसोबतच खडकी रेल्वे स्थानकावरूनही विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. खडकी स्थानकावरून एकूण २१ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये हजरत निजामुद्दीनसाठी १४ आणि श्रीगंगानगरसाठी ७ फेऱ्यांचा समावेश आहे. हडपसर आणि खडकी या दोन्ही स्थानकांवरून गाड्या चालवल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर एकाच वेळी होणारी गर्दी विभागण्यास मदत होणार आहे.

दानापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ३६ अतिरिक्त जनरल डबे

दिवाळीनिमित्त बिहारमधील दानापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे पुणे रेल्वे विभागाने दानापूरकडे जाणाऱ्या विविध गाड्यांना ३६ अतिरिक्त जनरल म्हणजेच अनारक्षित डबे जोडले.या अतिरिक्त डब्यांमुळे एका दिवसात सुमारे ७ हजार प्रवाशांच्या प्रवासाची सोय झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा झाला आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यावर भर

पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे. पुणे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी गाड्यांचे नियोजन वेगवेगळ्या स्थानकांवर करण्यात आले असून, सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात आले आहेत.

दरम्यान, विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट काढण्यापूर्वी संबंधित गाडीचा क्रमांक, सुटण्याची तारीख, वेळ आणि स्थानकाची माहिती तपासावी. कारण काही विशेष गाड्या पुणे रेल्वे स्थानकाऐवजी हडपसर किंवा खडकी स्थानकावरून सुटणार आहेत.

Inline Article Ad 728x90