लग्नानंतर काही दिवसांतच छळ सुरू झाल्याचा आरोप; पुण्यात विवाहितेच्या मृत्यूने खळबळ
पुण्यातील चंदननगर परिसरात 40 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुंड्याची मागणी तसेच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला असून, पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पुणे : पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 40 वर्षीय विवाहितेने राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुभांगी गरड असे मृत महिलेचे नाव आहे. हुंड्याची मागणी तसेच सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती अभिजीत गरड याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
लग्नाला वर्षही पूर्ण होण्याआधी सुरू झाला वाद?
शुभांगी गरड या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील होत्या. त्यांचा विवाह अभिजीत गरड याच्यासोबत जुलै 2025 मध्ये झाला होता.
माहेरच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, लग्नानंतर काही दिवसांतच संसारोपयोगी साहित्य, भांडी आणि अतिरिक्त हुंड्याच्या मागणीवरून शुभांगी यांना त्रास दिला जात होता. घरातील किरकोळ कारणांवरून त्यांचा अपमान केला जात असल्याचा तसेच मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पतीकडून दुर्लक्ष केले जात होते, तसेच खाण्यापिण्यावरही बंधने घातली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
13 सप्टेंबरला नेमकं काय घडलं?
13 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास शुभांगी आणि त्यांच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पती घराबाहेर गेला.
यानंतर शुभांगी यांनी चंदननगर येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली.
पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अभिजीत दिलीप गरड (पती), दिलीप गरड (सासरे), अनिता दिलीप गरड (सासू), अक्षय दिलीप गरड (दीर) आणि प्रियंका अक्षय गरड (जाऊ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 108, कलम 85 आणि कलम 3(5) अंतर्गत कारवाई केली आहे. यातील आरोपांची सत्यता आणि आत्महत्येमागील नेमकी परिस्थिती पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
माहेरच्या कुटुंबीयांची कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणातील पती अभिजीत गरड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, इतर आरोपींनाही तातडीने अटक करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शुभांगी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केली आहे.
या प्रकरणाची चर्चित ‘हगवणे प्रकरणाच्या’ धर्तीवर सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. चंदननगर पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.