दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं? राधा पाटीलनंतर आणखी ८ नृत्यांगनांवर गुन्हा

दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील आणि द्विअर्थी गाण्यांवर नृत्य केल्याच्या आरोपावरून सहकारनगर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. नृत्यांगना राधा पाटील हिच्यानंतर आता निशा मुंबईकर, शुभांगी थोरात यांच्यासह आणखी आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित कार्यक्रमांच्या आयोजक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

Pune Crime

पुणे : दहीहंडी उत्सव म्हटलं की गोविंदांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, पुण्यातील याच उत्सवादरम्यान झालेल्या एका नृत्य कार्यक्रमाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. अश्लील आणि द्विअर्थी गाण्यांवर नृत्य केल्याच्या आरोपातून पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आणखी आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह अन्य सहा जणींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

आधी राधा पाटील, आता आणखी आठ जणी रडारवर

दहीहंडी कार्यक्रमात अश्लील गाणी आणि नृत्य केल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी आठ नृत्यांगनांविरोधात कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या नृत्य आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कलाकारांपुरती कारवाई नाही; आयोजकही अडचणीत

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी केवळ नृत्यांगनांवर कारवाई केलेली नाही. कार्यक्रमाला परवानगी देणारे आणि आयोजन करणारे मंडळाचे पदाधिकारीही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच रिस्की बॉईज ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका वाद काय?

दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कथितरित्या अश्लील आणि द्विअर्थी गाणी वाजवण्यात आली आणि त्यावर नृत्य सादर करण्यात आले. यामुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? संबंधित नृत्य कार्यक्रमाला आवश्यक प्रमाणपत्र होते का? तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले होते का? या सर्व बाबींचा तपास आता सहकारनगर पोलीस करत आहेत.

‘त्या’ परवानगीचा मुद्दा ठरणार महत्त्वाचा?

महाराष्ट्रातील सार्वजनिक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांचे पालन करणे आणि आवश्यक प्रमाणपत्र घेणे अपेक्षित असते. त्याचबरोबर सार्वजनिक नृत्य कार्यक्रमांसाठी पोलिसांची आवश्यक परवानगीही घेणे बंधनकारक असते.

त्यामुळे या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात मंजूर स्वरूपापेक्षा वेगळे सादरीकरण करण्यात आले का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दहीहंडी की अश्लीलतेचा मंच?

दहीहंडीच्या उत्सवात मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील सादरीकरण होत असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. मात्र, पुण्यात या प्रकरणात पोलिसांनी कलाकारांसोबतच आयोजक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केल्याने आता या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता या प्रकरणातील तपासात आणखी कोणाची नावे समोर येणार? कार्यक्रमासाठी परवानगी नेमकी कशी मिळाली? आणि आयोजकांवर पुढे कोणती कारवाई होणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

 

Inline Article Ad 728x90