पीजी-हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; पुणे महापालिकेने 11 ठिकाणी ठोकलं सील
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील पीजी-हॉस्टेलची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी सुरू केली आहे. लोहगाव आणि निंबाळकरनगर परिसरातील तपासणीत अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा तसेच आवश्यक परवानग्यांचा अभाव आढळल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 18 सप्टेंबर रोजी विनापरवाना सुरू असलेली 11 पीजी-हॉस्टेल सील करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जागामालकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
.jpg)
पुणे : देशातील विविध भागांत घडलेल्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रुग्णालये, पीजी-हॉस्टेल आणि क्लासेसचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. त्यानुसार अग्निशमन प्रमुख गणेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध आस्थापनांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळपासून लोहगाव आणि निंबाळकरनगर परिसरातील जवळपास दहा पीजी-हॉस्टेलची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आल्याचे अग्निशमन विभागाने म्हटले आहे.
तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थी
तपासणी करण्यात आलेल्या काही पीजी-हॉस्टेलमध्ये स्थायी अथवा अस्थायी अग्निशमन यंत्रणा आढळून आली नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तीन ते चार मजली इमारतींमध्ये सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वास्तव्यास असल्याचेही तपासणीदरम्यान समोर आले.
अशा ठिकाणी आगीची घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
तपासणी केली अन् परवानग्यांबाबत समोर आलं वेगळंच चित्र
महापालिकेच्या माहितीनुसार, संबंधित पीजी-हॉस्टेलच्या बांधकामासह ते चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक परवानग्या तपासणीदरम्यान आढळून आल्या नाहीत.
बिल्डिंग परमिशन, ड्रेनेज, पाणीपुरवठा, झाडे, स्ट्रक्चरल परवानगी, कर विभागाशी संबंधित कागदपत्रे तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यांसह आवश्यक परवानग्या नसल्याचे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
11 पीजी-हॉस्टेल थेट सील
या पार्श्वभूमीवर अग्निशमन अधिकारी, महापालिकेचा बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग यांनी संबंधित पीजी-हॉस्टेलविरोधात कारवाई सुरू केली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी विनापरवाना सुरू असलेली 11 पीजी-हॉस्टेल सील करण्यात आली आहेत.
अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांचीही होणार तपासणी
महापालिकेचा अग्निशमन विभाग शहरातील विविध परिसरांमध्ये शाळा, महाविद्यालये, पीजी-हॉस्टेल आणि रुग्णालयांना भेट देऊन तपासणी करणार आहे.
तपासणीदरम्यान अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांनी आवश्यक अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत स्थितीत ठेवावी, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जागामालकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश
महापालिका आयुक्तांनी अनधिकृतपणे आणि विनापरवाना सुरू असलेल्या तसेच अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर तात्काळ कारवाई करून त्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच अशा आस्थापनांच्या जागामालकांवर कठोर कारवाई करून एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.