गणेश विसर्जनासाठी महावितरण सज्ज! पुण्यात २४ तास पथके तैनात; आपत्कालीन मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरणने विशेष नियोजन केले आहे. पर्वती, शिवाजीनगर आणि रास्तापेठ विभागांत अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली असून, लक्ष्मी रोडवर विशेष देखरेख कक्षही उभारण्यात येणार आहे.
.png)
Image for Representational Purposes Only
पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहावा आणि कोणतीही विद्युत दुर्घटना घडू नये, यासाठी महावितरणने व्यापक तयारी केली आहे. शहरातील पर्वती, शिवाजीनगर आणि रास्तापेठ या तीन प्रमुख विभागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान तसेच मानाच्या गणपतींचे विसर्जन पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहणार आहेत.
पर्वती विभागात १५ विशेष पथके तैनात
पर्वती विभागाच्या महात्मा फुले मंडई कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. या विभागात प्रत्येकी तीन कर्मचारी असलेली एकूण १५ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
शुक्रवारपेठ-सदाशिवपेठ शाखेअंतर्गत मंडई, तुळशीबाग, दगडूशेठ गणपती परिसर, कुमठेकर रोड, एस. पी. कॉलेज, अलका चौक आणि रामेश्वर चौक ते मामलेदार कचेरी या परिसरात सहा पथके तैनात असतील. पेरुगेट चौकात स्वतंत्र आपत्कालीन पथकही उपलब्ध असेल.
नवीपेठ-दत्तवाडी शाखेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, गांजवे चौक, दांडेकर पूल, जनता वसाहत, सिंहगड रोड, म्हात्रे पूल आणि म्हसोबा चौक परिसरात नऊ स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.
पर्वती विभाग नियंत्रण कक्ष
७८७५७६७२२७
२४ तास कार्यरत
शिवाजीनगर विभागात प्रमुख मार्गांवर विशेष लक्ष
शिवाजीनगर विभागातील मोदी गणपती, शिवाजीनगर गावठाण आणि खडकी या तीनही शाखांमध्ये स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
मोदी गणपती शाखेअंतर्गत समाधान चौक ते गणपती चौक, कुंठे चौक, शगुन चौक, चित्रशाळा चौक आणि गरुड गणपती चौक ते अलका चौक या मार्गांवर पथके तैनात राहतील.
शिवाजीनगर शाखेअंतर्गत पोलीस ग्राऊंड, महापालिका परिसर, वाकडेवाडी, संचेती हॉस्पिटल आणि पाटील इस्टेट परिसरात पथके कार्यरत असतील.
खडकी शाखेअंतर्गत सागर हॉटेल ते सोनार गल्ली, माऊली चौक ते राजमोल चौक, कँटोन्मेंट हॉस्पिटल ते गाडी अड्डा आणि भाटिया लॉज ते राम मंदिर या विसर्जन मार्गांवर विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
शिवाजीनगर विभाग तक्रार क्रमांक
७८७५७६७५३१
लक्ष्मी रोडवर विशेष देखरेख कक्ष
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या लक्ष्मी रोडवर झुडिओ शेजारी महावितरणकडून विशेष देखरेख कक्ष उभारण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कक्षातून वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीवर शेवटपर्यंत लक्ष ठेवणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील.
रास्तापेठ विभागात आपत्कालीन वीजपुरवठ्याची सुविधा
रास्तापेठ विभागातील समाधान चौक, लाल महाल चौक आणि पासोड्या विठोबा मंदिर चौक येथे प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या ठिकाणी आपत्कालीन वीजपुरवठ्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विसर्जन पूर्ण होईपर्यंत २४ तास यंत्रणा कार्यरत
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिरवणुकीचे प्रमुख मार्ग आणि विसर्जन स्थळांची पाहणी केली असून, विद्युत यंत्रणेची आवश्यक देखभाल व दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत महावितरणची पथके २४ तास कार्यरत राहतील, अशी माहिती प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.