पुण्यात गणेश विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ११ जणांना अटक; ६३ मोबाईलसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत मोबाईल चोरी आणि दरोड्याच्या तयारीत असल्याच्या आरोपाखाली ११ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ६३ महागडे मोबाईल, एक शेवरलेट क्रूझ कार, चाकू, कटर आणि मिरची पावडरसह एकूण ३० लाख ५७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Crime_ pune

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असताना शिवाजीनगर पोलिसांनी मोबाईल चोरी आणि दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून ११ जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६३ महागडे मोबाईल, एक शेवरलेट क्रूझ कार आणि घातक साहित्य असा एकूण ३० लाख ५७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दहा जण मालेगाव येथील, तर एक जण वाशीम जिल्ह्यातील आहे.

गणेश विसर्जनाच्या गर्दीत पोलिसांना मिळाली गोपनीय माहिती

२६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पुण्यातील जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, झाशीची राणी चौक, पुणे महानगरपालिका परिसर आणि लक्ष्मी रोड येथे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

याच दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या निगराणी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना खुडे ब्रिजजवळील नदीपात्र परिसरात काही जण हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि त्यांच्या पथकाने संबंधित परिसरात कारवाई केली. पोलिसांनी सकाळी सुमारे ६ वाजून ५० मिनिटांनी ११ संशयितांना ताब्यात घेतले.

६३ महागडे मोबाईल आणि शेवरलेट क्रूझ कार जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून विविध कंपन्यांचे ६३ महागडे मोबाईल फोन, एमएच ४३ एबी ९९९० क्रमांकाची शेवरलेट क्रूझ कार, चाकू, कटर आणि लाल मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३० लाख ५७ हजार ५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी केल्याचा आणि दरोड्याच्या तयारीत असल्याचा संशय आरोपींवर आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी कोण?

पोलिसांनी अटक केलेल्या ११ आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. अब्दुल कादीर नूर मोहम्मद (२८, मालेगाव)
  2. अब्दुल मलिक अब्दुल खालिक (२२, मालेगाव)
  3. जियाऊ रहमान ऊर्फ अताऊर रहमान शौकत हुसेन (२६, मालेगाव)
  4. मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (३१, मालेगाव)
  5. फैसल अजीज खान (२४, मालेगाव)
  6. हुजेफा अंजुम मोहम्मद साजिद अन्सारी (३०, मालेगाव)
  7. जुबेर अहमद मुख्तार अहमद (३५, मालेगाव)
  8. अझर अहमद अल्लाफ अहमद मोमीन अन्सारी (३०, मालेगाव)
  9. नावेद अख्तार शफीक अहमद अन्सारी (३३, मालेगाव)
  10. अतहर अहमद एजाज अहमद (२३, मालेगाव)
  11. अतुल मारोती इंगळे (२४, वाशीम)

आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि इतर ठिकाणी शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), ३१०(२), ३०९(४), शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई

पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मनीषा बलसे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.

Inline Article Ad 728x90