घोरपडीत स्कूलबसची दुचाकीला जोरदार धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, बहीण गंभीर जखमी

पुण्यातील घोरपडी येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकात मिनी स्कूलबसने दुचाकीला दिलेल्या धडकेत 16 वर्षीय रोहित कुदळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची 18 वर्षीय बहीण रिया गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वानवडी पोलिसांनी स्कूलबस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Accident

पुणे : घोरपडी परिसरातील राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकात मिनी स्कूलबसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याची 18 वर्षीय बहीण गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी (30 सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात स्कूलबस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित लक्ष्मण कुदळे (वय 16) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून रिया लक्ष्मण कुदळे (वय 18) ही जखमी झाली आहे. दोघेही मांजरी परिसरातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिया कुदळे ॲक्टिव्हा स्कूटर चालवत होती, तर तिचा भाऊ रोहित मागे बसला होता. दोघे राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकात आले असताना समोरून आलेल्या मिनी स्कूलबसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर रिया आणि रोहित रस्त्यावर फेकले गेले आणि दोघांनाही गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रोहितची प्रकृती अत्यंत गंभीर होती. बुधवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रियावर अद्याप उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, स्कूलबस चालक सागर याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याचा आरोप आहे. रिया कुदळे हिच्या तक्रारीवरून वानवडी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90