परदेशात नोकरीचे आमिष अन् ११ लाखांची फसवणूक; पोर्तुगालमध्ये तरुणीला वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा धक्कादायक आरोप

परदेशात सुपरमार्केटमध्ये नोकरीचे आमिष दाखवत नागपूरच्या २८ वर्षीय महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोर्तुगालमध्ये नेऊन तिला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडल्याचा आरोप करत महिलेने भारतात परतल्यानंतर पुण्याच्या विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील एजंटांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मानवी तस्करीच्या रॅकेटचा पोलीस तपास करत आहेत.

trafficking woman images

पुणे : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागपूर येथील २८ वर्षीय महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर तिला पोर्तुगालमध्ये नेऊन एका बिअर शॉपीच्या मालकाला विकल्याचा आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या महिलेने मोठ्या धाडसाने तेथून पळ काढत भारतात परतल्यानंतर पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील एजंटांसह परदेशातील काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही घटना १ डिसेंबर २०२५ ते १ जुलै २०२६ या कालावधीत पुण्यातील विमाननगर परिसरातील कार्यालय आणि पोर्तुगालमध्ये घडली. नागपूर येथील महिलेच्या तक्रारीवरून प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अजहर शेख, कपिल मिश्रा (रा. पुणे) तसेच वामसी, चैतन्य आणि हिम्मतसिंग (रा. पोर्तुगाल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, संबंधित महिला इन्स्टाग्रामवर परदेशातील नोकरी शोधत होती. त्यावेळी तिला 'We Migrate' या इन्स्टाग्राम पेजवर परदेशात नोकरी मिळालेल्या उमेदवारांचे व्हिडिओ दिसले. त्यानंतर तिने संबंधितांशी संपर्क साधला. तिला पुण्यातील कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी पोर्तुगाल, स्पेन, नेदरलँड, डेन्मार्क आणि पोलंडमध्ये सुपरमार्केट व इतर कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरमहा दीड लाख रुपये पगार, आठ तासांची ड्युटी आणि तीन वर्षांचे वर्क परमिट मिळेल, असे सांगून तिच्याकडून टप्प्याटप्प्याने ११ लाख रुपये घेतले.

यानंतर तिला परदेशात पाठवण्यात आले. स्पेनमार्गे ती पोर्तुगालला पोहोचली. तेथे तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला आणि दोन दिवस एका खोलीत ठेवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. नंतर तिला सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याऐवजी एका बिअर शॉपीमध्ये कामाला लावण्यात आले.

काही दिवसांनी बिअर शॉपीच्या मालकाने तिला आपल्या घरी कामासाठी बोलावले. त्यावेळी भारतातील एजंटने फोन करून मालकाला खुश ठेवण्यास सांगितल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिने विरोध केल्यानंतर मालकाने, "मी तुला पैसे देऊन विकत घेतले आहे. तू नोकरीसाठी नाही, तर माझ्या सांगण्यानुसार काम करण्यासाठी येथे आली आहेस," असे सांगितल्याचा दावा तिने केला आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, त्या घरात राजस्थान आणि हरियाणातील आणखी दोन भारतीय महिला होत्या. त्यांनाही वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी तिला सांगितले. त्यामुळे आपलीही फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

त्यानंतर महिलेने आपल्या पतीशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. २९ जून २०२६ रोजी ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. स्पेनमार्गे दोहा आणि दिल्ली असा प्रवास करून ती अखेर भारतात परतली.

भारतात आल्यानंतरही आरोपींनी तिच्याकडे आणखी ३ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर तिच्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करू, तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तिने केला आहे.

मानसिक धक्क्यामुळे तिने सुरुवातीला तक्रार केली नव्हती. मात्र, काही दिवसांनी पुणे गुन्हे शाखेची भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा आणि मानवी तस्करीच्या रॅकेटचा शोध पोलीस घेत आहेत. या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Inline Article Ad 728x90