महापालिकेत गिफ्ट बॉक्स आले कुठून? पुणे महापालिकेतील प्रकारामुळे खळबळ; चौकशीची मागणी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत गिफ्ट बॉक्स आणल्याचा प्रकार समोर आला असून खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कार्यालयात कोणत्याही प्रकारचे गिफ्ट स्वीकारण्यास मनाई केली असतानाही एका अज्ञात व्यक्तीने महापालिका आवारात गिफ्ट बॉक्स आणल्याचा आरोप आहे. काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारला. मात्र, गिफ्ट नेमके कोणी आणि कोणासाठी आणले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

PMC_Gift_Bags_Contraversy

पुणे : दिवाळीचा सण जवळ आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचारी, कामगारांना मिळणाऱ्या बोनस आणि दिवाळी भेटवस्तूंची चर्चा सुरू आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडूनही दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. मात्र, पुणे महापालिकेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गिफ्ट बॉक्स आणल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्तांनी कार्यालयात कोणत्याही प्रकारचे गिफ्ट स्वीकारण्यास मनाई केली असतानाही एका अज्ञात व्यक्तीने थेट महापालिका आवारात गिफ्ट बॉक्स आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आयुक्तांच्या आदेशानंतरही महापालिकेत गिफ्ट बॉक्सची आवक!

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या आवारात किंवा कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारण्यास सक्त मनाई केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचे गिफ्ट स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र, या आदेशानंतरही महापालिका आवारात एका अज्ञात व्यक्तीकडून गिफ्ट बॉक्स आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती महापालिकेच्या ग्राउंड फ्लोअरवर गिफ्ट बॉक्स घेऊन आल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने व्यक्तीला विचारला जाब

हा प्रकार सुरू असताना काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी संबंधित व्यक्तीला अडवून गिफ्ट बॉक्स कोणाला देण्यासाठी आणले आहेत, अशी विचारणा केली. मात्र, संबंधित व्यक्तीने कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. त्यानंतर एक गिफ्ट बॉक्स घेऊन ती व्यक्ती तेथून निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. उर्वरित गिफ्ट बॉक्स महापालिकेच्या ग्राउंड फ्लोअरवर ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर महापालिकेत गिफ्ट बॉक्स आणण्याची परवानगी कोणी दिली? हे गिफ्ट नेमके कोणासाठी होते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्लास्टिक पिशव्यांमधून गिफ्ट बॉक्स; सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, हे गिफ्ट बॉक्स प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणण्यात आल्याचा आरोप आहे. पुणे महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरही निर्बंध घातलेले असताना या नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच, संबंधित व्यक्ती महापालिका परिसरात गिफ्ट बॉक्स घेऊन येत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कोणतीही अडवणूक केली नाही, असा आरोप भरत सुराणा यांनी केला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

कुणासाठी आणि कुणाकडून आले गिफ्ट बॉक्स?

दरम्यान, यापूर्वीही पुणे महापालिकेच्या आवारात गिफ्ट बॉक्स आणल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावेळी लिफ्टमधून गिफ्ट बॉक्स वरच्या कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

आता पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आवारात गिफ्ट बॉक्स आणण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. हे गिफ्ट बॉक्स नेमके कोणी आणले, कोणत्या कारणासाठी आणले आणि महापालिकेतील कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी केली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि संबंधित गिफ्ट बॉक्सबाबत काय खुलासा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Inline Article Ad 728x90