लाडू हातात घेतला, कुस्करला अन् रंगही तपासला! तुकाराम मुंढेंनी सांगितलं फराळ तपासणीमागचं नेमकं लॉजिक
पुण्यातील सार्वजनिक दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः लाडू आणि इतर फराळ पदार्थांची गुणवत्ता तपासली. यावेळी त्यांनी हातात लाडू घेऊन तो कुस्करला. त्यांच्या या कृतीची चर्चा सुरू झाल्यानंतर मुंढे यांनी लाडू कुस्करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. रंग आणि तेलाच्या वापराची प्राथमिक तपासणी कशी केली, याची माहितीही त्यांनी दिली.

पुणे : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या कामाच्या धडाकेबाज शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुण्यातील एका सार्वजनिक दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमातील त्यांच्या कृतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर मुंढे यांनी स्वतः लाडू, चिवडा आणि इतर फराळ पदार्थांची गुणवत्ता तपासली. यावेळी त्यांनी हातात लाडू घेऊन तो चक्क कुस्करून पाहिला. त्यानंतर सर्वकाही व्यवस्थित असल्याचे सांगितले. मात्र, मुंढे यांनी लाडू कुस्करून नेमकं काय तपासलं? केवळ हाताने लाडू दाबून त्याची गुणवत्ता कशी समजू शकते? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. अखेर मुंढे यांनीच या तपासणीमागचं लॉजिक स्पष्ट केलं आहे.
लाडू कुस्करून रंग आणि तेलाची केली प्राथमिक तपासणी
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना तुकाराम मुंढे यांनी लाडू हाताने कुस्करण्यामागचं कारण सांगितलं. लाडू तयार करताना किती तेल आणि तूप वापरण्यात आलं आहे, याचा अंदाज घेण्यासाठी अशा प्रकारची प्राथमिक तपासणी करता येते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, "लाडू तयार करताना तेल किती वापरलं जातं, तूप किती वापरलं जातं, हे ओळखण्याचं ते तंत्र आहे. मी लाडू दाबून दाखवला होता. त्यावेळी माझ्या हाताला कोणताही रंग लागलेला नव्हता. म्हणजेच तो लाडू तयार करताना रंग वापरलेला नव्हता किंवा त्याचं प्रमाण नगण्य होतं. सोबतच माझ्या हातांना तेलही दिसलं नाही."
लॅब टेस्ट झाली होती, तरी स्वतः केली तपासणी
विशेष म्हणजे, कार्यक्रमातील लाडूंची प्रयोगशाळेत आधीच तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवालही योग्य असल्याचं मुंढे यांनी सांगितलं. मात्र, केवळ प्रयोगशाळेतील अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पदार्थांचीही तपासणी करण्याचा त्यांचा उद्देश होता.
"आम्ही त्या लाडूची आधीच लॅबमध्ये टेस्ट केली होती. लॅब रिपोर्टही सगळे बरोबर होते. परंतु तरीदेखील मी हातांनी तपासणी केली. फक्त लॅबच्या चाचणीपुरतेच सर्व नियमांचे पालन झाले आहे की प्रत्यक्षात सर्व लाडू तयार करतानाही नियम पाळले गेले आहेत, हे तपासण्याचा माझा उद्देश होता. म्हणून मी लाडू कुस्करला," असं त्यांनी स्पष्ट केलं.
लाडूचा वास घेऊनही तपासली गुणवत्ता
लाडू हाताने दाबण्यासोबतच त्याचा वास घेऊनही त्यातील घटकांचा अंदाज घेता येतो, असं मुंढे यांनी सांगितलं. एखादा खाद्यपदार्थ हातात घेतल्यावर त्यातील तेलाचं प्रमाण आणि त्याचा वास यावरून प्राथमिक निरीक्षण करता येतं, असंही त्यांनी नमूद केलं.
सजावटीसाठी ठेवलेल्या लाडूंबाबतही दिला महत्त्वाचा सल्ला
या कार्यक्रमात केवळ फराळाच्या गुणवत्तेची तपासणीच नव्हे, तर सजावटीसाठी ठेवलेल्या लाडूंच्या वापराबाबतही मुंढे यांनी सूचना केली. सजावटीसाठी ठेवलेले लाडू नंतर काय करणार, असा प्रश्न त्यांनी आयोजकांना विचारला होता.
यावर ते लाडू गाईंना खायला देणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. मात्र, हे लाडू उघड्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे ते खाण्यासाठी योग्य नसल्याचं मुंढे यांनी सांगितलं. अशा लाडूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असा सल्ला त्यांनी आयोजकांना दिला. आयोजकांनीही त्यांचा हा सल्ला मान्य केला.
एकूणच, पुण्यातील या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी केलेली लाडूंची तपासणी चर्चेचा विषय ठरली. प्रयोगशाळेतील चाचणीसोबतच प्रत्यक्ष खाद्यपदार्थांची पाहणी करण्यावरही त्यांनी भर दिल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं.