‘तक्रार केली अन् ती थेट क्लोज?’ पुण्यातील ध्वनीप्रदूषणावर नवा वाद; 24 तक्रारी पोहोचल्या आयुक्तांकडे
पुण्यात कर्णकर्कश्य लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या आवाजाबाबत 112 क्रमांकावर करण्यात येणाऱ्या तक्रारींचे योग्य निवारण होत नसल्याचा आरोप लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केला आहे. 20 सप्टेंबरच्या रात्री मंचाने 24 तक्रारी ई-मेलद्वारे थेट पोलीस आयुक्तांना पाठवल्याचे सांगितले असून, सायलेंट झोनची अंमलबजावणी, विभागवार अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि ध्वनी पातळीची आकडेवारी तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पुणे : शहरात कर्णकर्कश्य लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या आवाजाविरोधात करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी असलेली यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचा आरोप लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केला आहे. 112 क्रमांकावर तक्रार केल्यानंतर काही तक्रारींचे निवारण न करताच त्या बंद केल्या जात असल्याचा दावा मंचाने केला असून, याबाबत आता थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत.
मंचाच्या म्हणण्यानुसार, ध्वनीप्रदूषणाबाबत 112 क्रमांकावर नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र अनेकदा फोन उचलला जात नसल्याचा, तर काही वेळा फोन उचलल्यानंतर लगेचच बंद केला जात असल्याचा अनुभव नागरिकांना आला. काही प्रकरणांमध्ये तक्रारीवर प्रत्यक्ष कारवाई न होताच ती ‘क्लोज’ करण्यात आल्याचाही मंचाचा आरोप आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं?
लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने या मुद्द्यावर यापूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले आहे. 112 क्रमांकावरील तक्रार व्यवस्थेला पर्याय म्हणून संबंधित विभागातील पोलीस अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर जाहीर केले जातील, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा मंचाने केला आहे.
मात्र अद्याप अशी यादी वेबसाइटवर उपलब्ध झालेली नसल्याचे मंचाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी ध्वनीप्रदूषणाबाबत नेमकी तक्रार कुठे आणि कोणाकडे करायची, याबाबत संभ्रम कायम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सायलेंट झोनबाबतही मंचाचा सवाल
शहरातील सायलेंट झोनच्या अंमलबजावणीबाबतही पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळालेली नसल्याचा आरोप मंचाने केला आहे. विभागनिहाय सायलेंट झोन दर्शवणारे सूचना फलक लावण्याची कार्यवाहीही झालेली नसल्याचे मंचाने म्हटले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत, सायलेंट झोनची माहिती नागरिकांसाठी स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याची गरज मंचाने व्यक्त केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळावरही नाराजी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही मंचाने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील विविध भागांतील दररोजच्या ध्वनी पातळीच्या मोजणीची आकडेवारी सार्वजनिक होणे अपेक्षित असताना अद्याप ती समोर आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उत्सवाच्या काळातच ही माहिती नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते. उत्सव संपल्यानंतर आकडेवारी प्रसिद्ध झाल्यास त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फारसा उपयोग होणार नाही, असे मंचाने म्हटले आहे.
एका रात्रीत 24 तक्रारी थेट आयुक्तांकडे
मंचाने दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबरच्या रात्री ध्वनीप्रदूषणासंदर्भातील 24 तक्रारी ई-मेलद्वारे थेट पुणे पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आल्या. मात्र या आणि यापूर्वी केलेल्या तक्रारींची दखल घेतल्याचे कोणतेही उत्तर किंवा साधी पोहोचही मिळालेली नसल्याचा दावा मंचाने केला आहे.
तक्रारी ‘क्लोज’ झाल्याचे स्क्रीनशॉट, मेसेज, ई-मेलचे स्क्रीनशॉट तसेच संबंधित तक्रारस्थळांचे गुगल मॅप लोकेशन यांसारखे पुरावेही सोबत जोडल्याचे मंचाकडून सांगण्यात आले.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच नियमांकडे दुर्लक्ष होत असल्यास न्यायालयाने स्वतः दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणीही लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केली आहे.