स्वारगेटमध्ये भरदुपारी थरार! ५ लाखांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; प्रतिकार करताच ५८ वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने वार
पुण्यातील स्वारगेट परिसरात भरदुपारी तीन अज्ञात तरुणांनी दुचाकीस्वाराकडील ४ ते ५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिकार करताच आरोपींनी त्यांच्या पाठीवर आणि बरगडीवर कोयत्याने वार केले. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

Image for Representational Purposes Only
पुणे : स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी एका ५८ वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी सुमारे ४ ते ५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने प्रतिकार केल्याने आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश दशरथलाल ओसवाल (वय ५८) हे दुपारी सुमारे २ वाजून ५० मिनिटांनी दुचाकीवरून जात होते. सॅलिसबरी पार्क परिसरातील संभव नाथ जैन मंदिरासमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या बॅगेत अंदाजे ४ ते ५ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
प्रतिकार करताच पाठीवर आणि बरगडीवर कोयत्याने वार
ओसवाल यांनी आरोपींना प्रतिकार केला असता त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर आणि बरगडीवर वार झाले असून ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ॲडव्हेंटिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ओसवाल यांची प्रकृती स्थिर आहे. सीटी स्कॅननंतर त्यांच्या दुखापतींचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
दरम्यान, या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे. भरदुपारी घडलेल्या या लुटीच्या प्रयत्नामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.