तिरंगा रॅलीचा परिणाम; पुण्यात ‘या’ मार्गांवर ट्रॅफिक डायव्हर्जन
11 ऑगस्टला पुण्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत तिरंगा रॅली होणार असून FC रोडसह काही प्रमुख मार्गांवर दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन आधीच करावे.

पुणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत पुण्यात 11 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर FC रोड आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रॅलीदरम्यान नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ही रॅली ललित महाल हॉटेल चौकातून सुरू होऊन ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक आणि गुडलक चौक मार्गे गारवारे चौकात पोहोचणार आहे. रॅलीच्या मार्गावरील वाहतूक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
स्वारगेट ते पुणे विद्यापीठ
स्वारगेटहून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी अण्णाभाऊ साठे चौक → एन.सी. फडके चौक → मंगीरबाबा चौक → सेनादत्त चौक → बाल शिवाजी → म्हात्रे पूल → नळ स्टॉप → लॉ कॉलेज रोड हा पर्यायी मार्ग वापरावा.
स्वारगेट ते खडकी / जुना मुंबई-पुणे महामार्ग
स्वारगेटहून खडकी किंवा जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे चौक → पुरम चौक → बाजीराव रोड → गाडगीळ पुतळा → कुंभारवाडा → RTO चौक या मार्गाचा वापर करावा.
खंडोजी बाबा चौकाकडे जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग
खंडोजी बाबा चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांसाठीही वाहतूक पोलिसांनी विविध पर्यायी मार्ग सुचवले आहेत. यामध्ये नळ स्टॉप → पौड फाटा, अलका टॉकीज → केळकर रोड, सेनादत्त चौक → म्हात्रे पूल तसेच सेवासदन चौक → शनिवारवाडा या मार्गांचा समावेश आहे.
या भागातून जात असाल तर FC रोड टाळा
शेलारमामा चौक, प्रभात रोड, भांडारकर रोड, बीएमसीसी रोड, चतु:शृंगी रोड आणि मॉडेल कॉलनी परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी रॅलीच्या काळात FC रोडचा वापर टाळावा. या वाहनचालकांनी शक्य असल्यास लॉ कॉलेज रोड किंवा सेनापती बापट रोडचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. दरम्यान, तिरंगा रॅलीमुळे काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.