निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडीओवर विश्वास ठेवणं पुण्यातील महिलेला पडलं महागात!
पुण्यातील कोथरूडमधील ६२ वर्षीय महिलेची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडीओचा वापर करून ८ लाख ९ हजार १०६ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. फेसबुकवर बनावट गुंतवणूक व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेने आपली वैयक्तिक माहिती शेअर केली. त्यानंतर सायबर ठगांनी तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडून शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून महिलेने विविध बँक खाती आणि UPI आयडीवर पैसे पाठवले. २४ मे २०२६पर्यंत तिने एकूण ८.०९ लाख रुपये ट्रान्सफर केले.

पुणे : पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडीओ वापरून एका 62 वर्षीय महिलेची तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. कोथरूडमधील गुरुगणेश नगर परिसरात राहणाऱ्या या महिलेने शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, 12 डिसेंबर 2025 रोजी महिलेला फेसबुकवर निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडीओ दिसला. या व्हिडीओमध्ये सरकारच्या विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केल्याचं दाखवण्यात आलं होतं.
देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याने महिलेने हा व्हिडीओ खरा असल्याचं समजून त्यावर विश्वास ठेवला. व्हिडीओतील लिंकवर जाऊन तिने ऑनलाइन फॉर्म भरला. यावेळी आधार कार्ड, मोबाइल नंबर, फोटो आणि इतर वैयक्तिक माहितीही अपलोड केली. यानंतर सायबर ठगांनी महिलेला टेलिग्रामवर जोडून एका ग्रुपमध्ये सहभागी केलं. ग्रुपच्या अॅडमिनने ‘सुरेश’ नाव सांगत महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं आणि मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं. ठगांच्या सांगण्यावरून महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि UPI आयडीवर पैसे पाठवण्यास सुरुवात केली. 24 मे 2026 पर्यंत तिने तब्बल 8 लाख 9 हजार 106 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
AI डीपफेकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा. सोशल मीडियावर दिसणारा कोणताही गुंतवणुकीचा व्हिडीओ खरा आहे, असं समजून पैसे ट्रान्सफर करू नका.