पुण्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची थेट अंतराळ भरारी! NASA, ESA आणि ISROच्या अभ्यास दौऱ्यासाठी १०३ विद्यार्थ्यांची निवड

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील १०३ विद्यार्थ्यांना NASA, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि ISROच्या अभ्यास दौऱ्याची संधी मिळाली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि IUCAA यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत या विद्यार्थ्यांची निवड झाली.

pune-zp-school-students

Ai Generated

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल १०३ विद्यार्थ्यांची NASA, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि ISROच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. सोमवारी या निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.


या निवडीत २५ विद्यार्थ्यांना NASA, २५ विद्यार्थ्यांना ESA, तर ५० विद्यार्थ्यांना ISROला भेट देण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणी दौऱ्यावर जाऊ शकले नाही, तर त्यांची जागा भरता यावी यासाठी २७ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी देखील तयार करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल १०० विद्यार्थी इयत्ता सहावी आणि सातवीतील आहेत. तर इयत्ता आठवीतील तीन विद्यार्थ्यांचीही निवड झाली असून, प्रत्येकी एका विद्यार्थ्याला NASA, ESA आणि ISROच्या यादीत स्थान मिळाले आहे.


ही निवड प्रक्रिया तब्बल तीन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध टप्प्यांनंतर अंतिम फेरीसाठी २५८ विद्यार्थ्यांची निवड झाली.


अंतिम फेरीची परीक्षा ४, ५ आणि ६ ऑगस्ट रोजी IUCAAच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाल्यानंतर IUCAAचे प्राध्यापक भूषण गाड्रे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.


ग्रामीण आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना जगातील आघाडीच्या अंतराळ संस्थांचे काम प्रत्यक्ष पाहता यावे, अंतराळ विज्ञानाची ओळख जवळून व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही केवळ सहल नसून, त्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक स्वप्नांना मिळालेली थेट अंतराळाची दिशा ठरणार आहे.

Inline Article Ad 728x90