राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधीच राजकीय वातावरण तापलं; ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर निर्बंधांचं सावट
राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी 18 ते 31 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने कार्यक्रमावर निर्बंधांचं सावट आहे. या निर्णयावर काँग्रेसने आक्षेप घेत प्रशासनावर कार्यक्रम रोखण्याचा आरोप केला असून, गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम केवळ तरुणी आणि विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात येणार असून, शिक्षण, रोजगार, परीक्षा, पेपरफुटी आणि भविष्यातील संधी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत.
‘छात्रों की गूंज’ ही राहुल गांधींच्या विद्यार्थी आणि युवा-केंद्रित देशव्यापी मोहिमेची पुढची कडी आहे. या मोहिमेची सुरुवात 17 जून रोजी कोटा येथून झाली होती. त्यानंतर देहरादून आणि प्रयागराज येथेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पुण्यातील कार्यक्रमात विशेषतः Gen Z मधील तरुण महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याच्या चार दिवस आधीच पुणे पोलिसांनी 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत चौदा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, सभा किंवा मिरवणूक काढणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
तसेच शस्त्रे, स्फोटके, दगड किंवा काठ्या बाळगण्यास आणि नेत्यांचे पुतळे अथवा छायाचित्रे प्रदर्शित किंवा जाळण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे आगामी सण, तसेच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून संभाव्य आंदोलने, मोर्चे, बंद आणि निदर्शने लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश औपचारिक अर्थाने कर्फ्यू नसून, पूर्वपरवानगी घेऊन कार्यक्रम आयोजित करण्याची तरतूद कायम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयावरून काँग्रेस आणि प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पुणे पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशावर आक्षेप घेतला असून, राहुल गांधींचा कार्यक्रम रोखण्यासाठीच हे निर्बंध लादण्यात आल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने यापूर्वी कोटा, देहरादून आणि प्रयागराज येथील राहुल गांधींच्या विद्यार्थी-केंद्रित कार्यक्रमांनाही अडथळे आणण्यात आल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून परवानगीचा प्रश्न निर्माण झाल्यास काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राहुल गांधींचा पुणे दौरा आणि ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांचा प्रतिबंधात्मक आदेश 31 ऑगस्टपर्यंत लागू असला तरी पूर्वपरवानगीने कार्यक्रम घेण्यास पूर्णपणे बंदी नाही. त्यामुळे आता 22 ऑगस्टच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि काँग्रेस त्यावर काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.