'महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देताय?'; राज ठाकरेंचं मोठं विधान, वाहतूक व्यवस्थेवरून सरकारला सुनावलं!

नवी मुंबईतील मनसे वाहतूक सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि नियोजनशून्य विकासावरून सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात शिस्त आणण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज असल्याचे सांगत त्यांनी राज्याच्या सत्तेबाबत मोठे विधान केले.

raj-thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील वाहतूक व्यवस्था आणि शहरी नियोजनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नवी मुंबईतील मनसे वाहतूक सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी, 'महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी खरंच वाट पाहतोय. शिस्त आणणं हे काही रॉकेट सायन्स नाही, त्यासाठी फक्त इच्छाशक्ती लागते,' असे विधान केले.

राज्यातील शहरांमध्ये नागरिकांना फुटपाथवरून चालता येत नाही. पुरेशा बागा, मैदाने आणि पार्किंगच्या सुविधा नाहीत. मात्र, दुसरीकडे जीडीपी वाढल्याचे सांगितले जाते, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पुण्यात केवळ ७ टक्के रस्ते; नगरनियोजनावर सवाल

राज ठाकरे यांनी पुण्यातील रस्त्यांच्या परिस्थितीवरही भाष्य केले. शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत रस्त्यांचे प्रमाण १५ टक्के असावे, मात्र पुण्यात ते केवळ ७ टक्के असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारकडून मोठ्या प्रमाणात एफएसआय दिला जात असल्याने इमारतींची संख्या वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते आणि इतर सुविधांचे नियोजन होत नसल्याची टीका त्यांनी केली. विकास आराखडे तयार केले जात असले तरी प्रत्यक्ष नगरनियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-चलान आणि वाहतूक नियमांवरूनही नाराजी

ई-चलान प्रणालीला विरोध नसला तरी दंड आकारण्याची पद्धत पारदर्शक असावी, असे राज ठाकरे म्हणाले. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियमभंगाची नोंद करून दंड आकारला जावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच दुचाकीस्वारांकडून सिग्नल तोडणे, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे आणि अवजड वाहनांकडून लेनची शिस्त न पाळणे यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वाहतुकीचे नियम पाळण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून नागरिक आणि प्रशासनानेही शिस्त पाळली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. पार्किंग आणि नो-पार्किंग क्षेत्रे वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्यांनी दर्शवण्याची सूचनाही त्यांनी केली.

दरम्यान, राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी योग्य नियोजन आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सत्तेबाबत केलेल्या विधानामुळे त्यांच्या भाषणाची चर्चा सुरू झाली आहे.

Inline Article Ad 728x90