साखर कारखानदारांविरोधात राजू शेट्टी आक्रमक; ऊस दरासाठी हजारो शेतकऱ्यांसह किणी टोलवर आंदोलन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि वाढीव ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Raju_Shetty

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे तसेच ऊस दराच्या प्रश्नाकडे साखर कारखानदार आणि सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या ऊस दरासाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. हे आंदोलन बेमुदत स्वरूपाचे असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत राजू शेट्टींचा झंझावाती दौरा

आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राजू शेट्टी यांनी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील विविध गावांचा झंझावाती दौरा केला. यावेळी त्यांनी दत्तवाड, अब्दुललाट, आकिवाट, शिरटी, बुबनाळ, नांदणी, उदगाव, कोथळी, दानोळी, नरंदे, आळते आणि रुई या गावांमध्ये गावभेटी देत कोपरा सभा आणि शेतकरी बैठका घेतल्या.

या सर्व गावांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यामुळे ३ नोव्हेंबरच्या आंदोलनासाठी शेतकरी संघटनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.

साखर, बगॅस आणि मोलॅसिसमधून नफा; मग ऊस दरवाढीस नकार का?

राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. खुल्या बाजारात साखरेचे दर वाढले असून साखर कारखान्यांना उपपदार्थांपासूनही मोठे उत्पन्न मिळत आहे. बगॅस आणि मोलॅसिसचे दरही वाढलेले असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दर देण्यास कारखानदार नकार का देत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

साखर कारखानदार आणि सरकारच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कारखान्यांना सर्व बाजूंनी नफा मिळत असताना त्याचा योग्य मोबदला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महागाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत

शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना शेट्टी म्हणाले की, राज्यातील शेतकरी एका बाजूला भीषण महागाई आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करत आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना शेती करणेही कठीण झाले आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या घामाचा योग्य मोबदला आणि उसाचा रास्त दर मागितलाच पाहिजे. आता शेतकऱ्यांनी शांत बसून चालणार नाही. अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक अशीच सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.

३ नोव्हेंबरपासून किणी टोल नाक्यावर बेमुदत आंदोलन

३ नोव्हेंबर रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन हे केवळ एक दिवसाचे आंदोलन नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आरपारची लढाई असेल, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी, प्रत्येक घरातून आंदोलनात सहभागी व्हावे आणि ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता किणी टोल नाक्यावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आता ऊस दराच्या प्रश्नावर सरकार आणि साखर कारखानदार काय भूमिका घेतात, तसेच ३ नोव्हेंबरच्या आंदोलनाला किती मोठा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90