जमुईतील व्हिडिओ पाहून रोहिणी खडसे संतापल्या; ‘ही जमात फोफावत चाललीय...’ म्हणत दिला थेट इशारा

बिहारच्या जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्रासोबत गैरवर्तन व छेडछाड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे,” असं म्हणत त्यांनी अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली असून राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

Rohini Khadse

मुंबई : बिहारच्या जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला रस्त्यात अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही प्रतिक्रिया देत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. बिहारमधील व्हिडिओ मन हेलावून टाकणारा आणि तितकाच चीड आणणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत तथाकथित ‘संस्कृती रक्षकांनी’ केलेल्या वर्तनावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’

या घटनेचा संदर्भ देत रोहिणी खडसे यांनी, “ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे. यांना कोण प्रोत्साहन देत आहे? यांना कायद्याची भीती राहिली नाही का?” असा सवाल उपस्थित केला.

अशा प्रवृत्तींवर शासनाने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. वेळीच कारवाई झाली नाही तर अशा व्यक्ती भविष्यात आणखी आक्रमक होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला.

सिंहगडावरील घटनेचाही केला उल्लेख

रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील एका पूर्वीच्या घटनेचाही संदर्भ दिला. सिंहगडावर पर्यटनासाठी आलेल्या आठ वर्षांच्या मुलीने बरमूडा घातल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांसोबत काही जणांनी वाद घालून मारहाण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

जमुईतील प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून एफआयआर नोंदवणे, व्हिडिओ फुटेजच्या आधारे संबंधितांची ओळख पटवणे आणि आरोपींवर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच प्रकरणाची निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जमुई प्रकरणात तिघांना अटक

ही घटना 19 सप्टेंबरच्या सायंकाळी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी पीडितांचा शोध घेतला आणि त्यांच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सात जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचं वृत्त असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून जमुई पोलिसांनी तपासासाठी विशेष पथकही स्थापन केले आहे.

Inline Article Ad 728x90