'औषध निरीक्षक भरतीचा पेपर दोन दिवस आधीच लीक'; रोहित पवारांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी एफडीएच्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप केला. पेपर तयार करणाऱ्या व्यक्तीकडूनच परीक्षेच्या दोन दिवस आधी काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी आपण एमपीएससी कार्यालय आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

rohit pawar Image

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी एफडीएच्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. एमपीएससीचा संपूर्ण पेपर फुटला नव्हता, पण पेपर तयार करणाऱ्या व्यक्तीकडूनच काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रश्न देण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

मुंबईत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, गेल्या काही वर्षांत टीईटी, नीट, एसआरपीएफ, एचएससी, तलाठी, कोतवाल, महाजेनको आणि इतर अनेक भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, पैसे आणि ओळखीच्या जोरावर काही जण सरकारी यंत्रणेत प्रवेश मिळवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

औषध निरीक्षक भरतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विभागात तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी आहेत. मात्र, जर पैसे देऊन कोणी अधिकारी झाले, तर ते आधी खर्च केलेले पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

रोहित पवार यांनी सांगितले की, औषध निरीक्षक भरतीची परीक्षा 22 मार्च 2026 रोजी झाली होती. या परीक्षेला सुमारे 44,500 उमेदवार बसले होते. नंतर निकाल जाहीर झाला आणि अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण झाली.

या भरतीत नंदुरबारमधील एका खासगी क्लासमधून पेपर लीक झाल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉट्सअॅपवर प्रश्न पाठवले जात होते. काही मिनिटांत ते संदेश डिलीट केले जात होते. मात्र, एका विद्यार्थ्याने पुरावा म्हणून ते प्रश्न मित्राला पाठवल्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि आधी पाठवण्यात आल्याचा दावा केलेले प्रश्न दाखवले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आपण एमपीएससी कार्यालयात जाणार असून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रोहित पवार यांनी केलेले आरोप गंभीर असले तरी या प्रकरणावर राज्य सरकार, एमपीएससी किंवा संबंधित यंत्रणेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Inline Article Ad 728x90