‘मुख्यमंत्र्यांनी भीमनवारांचा राजीनामा घ्यावा’; रोहित पवारांचा गंभीर आरोप, मुंढेंच्या नावाची चर्चा
MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून आमदार रोहित पवार यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचवेळी तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, असा दावा करत पवारांनी त्यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे.

पुणे : MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आता आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि आमदार रोहित पवार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. पेपरफुटी प्रकरणात माझ्याविरुद्ध पुरावे दाखवा, मी पायउतार होईल, असं भीमनवार यांनी म्हटल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या कार्यकाळातील तक्रारी, कथित गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या मुद्द्यांवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री यांनी भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. कारवाई झाली नाही तर भीमनवार यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याचा संदेश समाजात जाईल, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, पवारांनी केलेल्या एका दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवा राजकीय ट्विस्ट मिळाला आहे. तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी सगळं चेक केलं आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी असलेल्या अटींनुसार मुंढे पात्र ठरू शकतात, असं सांगत त्यांनी तुकाराम मुंढे यांची MPSC अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी केली.
विक्रम पाचपुते यांच्या चर्चेवरूनही पवारांचा निशाणा
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत चर्चा केली. यावरूनही रोहित पवार यांनी पाचपुते यांच्यावर निशाणा साधला.
भाजपकडून कोणीतरी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आलं होतं, मात्र त्यांची फजिती झाली, असा दावा पवारांनी केला. सत्ताधारी आमदारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं, आपण चर्चेसाठी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
“या आणि विद्यार्थ्यांसोबत बसा, आंदोलन करा,” असं आवाहन करत पवारांनी विक्रम पाचपुते यांना थेट आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान दिलं.
‘पुराव्यांचा पार्ट 2’ आणणार?
MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्याविरोधात आपल्याकडे आणखी माहिती असल्याचा दावा करत रोहित पवार यांनी ‘पुराव्यांचा पार्ट 2’ आणणार असल्याचंही सांगितलं.
भीमनवार यांच्या विरोधात यापूर्वीच तक्रार करण्यात आली असेल, तर त्यावर चौकशी आणि कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्र्यांकडून भीमनवार यांना संरक्षण दिलं जात असल्याचा संदेश जाऊ शकतो, असं पवार म्हणाले.
‘चाणक्य’च्या मुद्द्यावर अमित शहांवर टोला
यावेळी रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. चाणक्यांचा फोटो दाखवत, अनेकजण स्वतःला चाणक्य समजतात, त्यांनी चाणक्यांचं तरी ऐकावं, असा टोला त्यांनी लगावला.
MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. तसेच, या प्रकरणात कोणालाही न्यायालयात जाऊन PIL दाखल करता येईल, न्यायालय यामध्ये लक्ष घालेल, असंही त्यांनी सांगितलं.
आता रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार आणि राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे विद्यार्थ्यांसह सर्वांचं लक्ष लागलं आहे.