तुरुंगातील ‘त्या’ आठवणी पुन्हा उघडणार? संजय राऊतांचं नवं पुस्तक येतंय; नाव वाचूनच वाढली उत्सुकता

‘नरकातला स्वर्ग’नंतर खासदार संजय राऊत यांचं ‘बोध कीर्तन’ हे नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. तुरुंगातील काही अनुभव, राहून गेलेल्या नोंदी आणि प्रेरणादायी किस्स्यांचा या पुस्तकात समावेश असणार आहे.

Sanjay_Raut

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा आपल्या लेखणीतून काही नव्या आठवणी आणि अनुभव वाचकांसमोर आणणार आहेत. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकानंतर आता त्यांचं आणखी एक पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या नव्या पुस्तकाचं नाव ‘बोध कीर्तन’ असून, स्वतः संजय राऊत यांनी सोशल मीडियावर त्याची झलक शेअर केली आहे.

मात्र, या पुस्तकात नेमकं काय असणार? तुरुंगातील कोणते अनुभव राऊत पहिल्यांदाच सांगणार? याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

‘बोध कीर्तन’मध्ये नेमकं काय?

संजय राऊत यांनी त्यांच्या नव्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली. मेहता पब्लिशिंग हाऊसकडून हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राऊत यांनी या पुस्तकाला ‘एक अनोखे पुस्तक’ असं संबोधलं आहे. ‘नरकातला स्वर्ग’ लिहिताना केलेल्या काही नोंदी आणि त्यावेळी पुस्तकात समाविष्ट न होऊ शकलेल्या गोष्टी ‘बोध कीर्तन’मधून वाचकांसमोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पुन्हा उलगडणार तुरुंगातील अनुभव

‘बोध कीर्तन’मध्ये संजय राऊत यांच्या तुरुंगातील काही आठवणी, विविध प्रसंग तसेच त्यांना प्रेरणा देणारे काही किस्से असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आधीच्या पुस्तकानंतर आता नव्या पुस्तकातून कोणते नवे खुलासे किंवा अनुभव समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळासह वाचकांचं लक्ष लागलं आहे.

‘नरकातला स्वर्ग’नंतर नवं पुस्तक

संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक 17 मे 2025 रोजी प्रकाशित झालं होतं. या पुस्तकात त्यांनी केंद्रातील राजकीय घडामोडी, ईडीची कारवाई, स्वतःची अटक, तुरुंगातील दिवस आणि सुटकेनंतरच्या अनुभवांसह अनेक विषयांवर भाष्य केलं होतं.

आता त्याच काळातील काही राहून गेलेल्या नोंदी आणि वेगळे अनुभव ‘बोध कीर्तन’च्या माध्यमातून समोर येणार असल्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Inline Article Ad 728x90