शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळ निवारणासाठी मोठ्या मागण्या; शेतकऱ्यांना थेट मदत आणि कर्जमाफीचा आग्रह!
महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. कर्जमाफी, पीक विमा, पिण्याचे पाणी आणि रोजगार हमी योजनेसह विविध उपाययोजना राबवण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

मुंबई : राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी
शरद पवार यांनी १८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपये विशेष आर्थिक मदत देण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.
कर्जमाफीसह पीक विम्याचाही मुद्दा
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तातडीने राबवून नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पवारांनी केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान एक लाख रुपयांपर्यंत वाढवावे, तसेच एक रुपयातील पीक विमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पाणीटंचाई, रोजगार आणि शिक्षणासाठी उपाययोजना
दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विशेष कामे सुरू करावीत. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यकतेनुसार टँकर उपलब्ध करून द्यावेत. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि वाळणाऱ्या फळबागांसाठी टँकरची व्यवस्था करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, कृषी क्षेत्रातील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सरकार कोणत्या उपाययोजना राबवणार आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे.