राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका; 'आम्ही कोणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या'

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आपला पक्ष कोणत्याही पक्षात विलीन होणार नसून, ज्यांना एकत्र यायचे आहे त्यांनी आपल्या पक्षात यावे, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

Sharad_Pawar

मुंबई : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सातत्याने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही कोणासोबत जाणार नाही. कोणाला यायचे असेल, तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे पवार यांनी सांगितले. तसेच भाजपप्रणीत एनडीएसोबत जाण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.


विलिनीकरण करायचे असेल तर आमच्याच पक्षात या – शशिकांत शिंदे

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही विलिनीकरणाबाबत भूमिका मांडली. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. त्यावेळी काही मुद्द्यांवर सहमती झाली होती आणि शरद पवारांच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया करण्याचे ठरले होते, असे शिंदे यांनी सांगितले.

मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर हा विषय मागे पडला. आता कोणाला विलिनीकरण करायचे असल्यास त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही मे महिन्यात शिंदे यांनी दोन्ही गटांमधील विलिनीकरणाची चर्चा थांबवण्यात आल्याचे जाहीर केले होते.


महाविकास आघाडीने एकत्र आंदोलन करण्याची गरज

राज्यातील विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन करावे, अशी भूमिकाही शशिकांत शिंदे यांनी मांडली. सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे आंदोलन केल्यास त्याचा अधिक परिणाम होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही ठाकरे गटांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रस्तावित मोर्चाबाबतही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. या मोर्चासाठी अद्याप निमंत्रण मिळाले नसून, निमंत्रण आल्यास सहभागी होण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Inline Article Ad 728x90