अपघात की कट? ठाकरे गट - "आमदार दिलीप सोपल" ह्यांच्या घराच्या दिशेने जळते फटाके
बार्शी : सोलापूर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर बार्शी येथे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात जळते फटाके फेकून आग लावल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SAKSHI MEGHA PRABHUविधान परिषद निकालानंतर मध्यरात्री घडला प्रकार
सोलापूर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर बार्शी येथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात फटाके फोडून आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादीनुसार, 23 जून रोजी पहाटे सुमारे सव्वा एक (1.15) वाजण्याच्या सुमारास आमदार सोपल हे घरी झोपलेले असताना घराच्या मागील बाजूस असलेल्या बीटीएम पॅव्हेलियन मैदानाच्या दिशेने एक जळता फटाका घराकडे येऊन फुटला. त्यानंतर परिसरातील झाडांना आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
फटाक्यांच्या आवाजाने जाग; घरात घुसल्याचा आरोप
फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे आमदार सोपल यांना जाग आली. त्यांनी बाहेर पाहिले असता झाडांना आग लागल्याचे दिसले. त्याचवेळी त्यांचे कर्मचारी गुरुपाद स्वामी हेही जागे झाले. फिर्यादीनुसार, नाथा मोहिते आणि योगेश लोंढे हे कंपाऊंडची भिंत ओलांडून घराच्या आवारात घुसले होते आणि फटाके पेटवत होते. आमदार सोपल त्यांच्या दिशेने जाताच त्यांनी तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घराच्या दिशेने जळते फटाके फेकल्याचा दावा
घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांचा मुलगा ओंकार याने बाहेर पाहिले असता आशिष लोंढे, कुणाल खेंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे हे घराच्या दिशेने जळते फटाके फेकत असल्याचे दिसल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या सर्व आरोपींची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत.
अग्निशमन दलाने आग विझवली; दीड लाखांचे नुकसान
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीत परिसरातील झाडे तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले असून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आठ जणांविरोधात गुन्हा; तपास सुरू
फिर्यादीत आरोपींनी जिवाला धोका निर्माण करण्याच्या तसेच घर स्फोटकांच्या साहाय्याने जाळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी आमदार दिलीप सोपल, त्यांचा मुलगा योगेश, सून उज्ज्वला आणि नातू आर्यन हे घरात उपस्थित होते, असेही नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी नाथा मोहिते, योगेश लोंढे, आशिष लोंढे, कुणाल खेंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे या आठ जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.