मुख्यमंत्र्यांसमोर तरुणाने मांडली अनोखी व्यथा; पाणीटंचाईमुळे लग्न जुळेना, फडणवीसांनी काय दिलं आश्वासन?
सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एका तरुणाने आपली वेगळीच समस्या मांडली. पाऊस आणि पाणी नसल्यामुळे लग्न जुळत नसल्याची व्यथा त्याने सांगितली. यावर मुख्यमंत्र्यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

सोलापूर : राज्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पाण्याअभावी उभी पिके करपू लागली असून ग्रामीण भागात पाणीटंचाई गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (२३ सप्टेंबर) सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी बार्शी तालुक्यातील धानोरे येथे एका तरुणाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली व्यथा चर्चेचा विषय ठरली.
पाऊस नाही, पाणी नाही; त्यामुळे लग्नही जुळेना!
धानोरे येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या एका तरुणाने परिसरातील पाणीटंचाईमुळे लग्न जुळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. गावात पाण्याची सोय नसल्याने शेतकरी कुटुंबांतील तरुणांना विवाहासाठी नकार मिळत असल्याची खंत त्याने व्यक्त केली.
दुष्काळाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नसून ग्रामीण भागातील कुटुंबांच्या सामाजिक आयुष्यावरही त्याचा परिणाम होत असल्याचे तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
तरुणाच्या व्यथेवर मुख्यमंत्र्यांनी काय दिलं उत्तर?
तरुणाचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित तरुणाने दिली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे आश्वासन
शेतीच्या नुकसानीची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येईल, तसेच पिण्याचे पाणी आणि अन्नधान्याची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे