सोलापुरात विद्यार्थ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड! पुण्यातून लागला सुगावा; गावठी पिस्तुलासह लाखाचा मुद्देमाल जप्त
सोलापुरातील एमआयटी कॉलेजजवळ विद्यार्थ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा फौजदार चावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर : सोलापूर शहरात विद्यार्थ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा फौजदार चावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एमआयटी कॉलेजजवळ घडलेल्या लुटीच्या घटनेचा तपास करत पोलिसांनी एका आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एका अल्पवयीन मुलाला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.
एमआयटी कॉलेजजवळ नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयान डोणगावकर हे आपल्या चार मित्रांसह एमआयटी कॉलेजजवळ थांबले होते. यावेळी ॲक्सेस दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून ३ हजार ५०० रुपये हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला.
पुण्यातून मिळाला महत्त्वाचा सुगावा
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील चाफेकर चौकातून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत इतर साथीदारांची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सोलापुरातील बाळे ब्रिज परिसरातून प्रज्वल वित्तेश गवळी आणि आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. आरोपी प्रज्वल गवळी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.