‘ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले तर परत जाणार नाही!’ नरेश म्हस्केंचा विरोधकांना थेट इशारा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना इशारा देत, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात चुकीची वक्तव्ये केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.

Naresh_Mhaske

ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्येप्रकरणी संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. पूर्णेकर यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पूर्णेकर कुटुंबीयांचे पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला २८ दिवस उलटूनही तपासात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणातील कथित सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर अनेक तास ठिय्या आंदोलन केले.

दुसरीकडे, पूर्णेकर यांच्या समर्थकांनी घोडबंदर आणि मानपाडा परिसरात रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद ठाण्यातील राजकीय आणि सार्वजनिक जीवनात उमटताना दिसत आहेत.

गुरुवारी ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चा

पूर्णेकर यांना न्याय मिळावा आणि हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात सायंकाळी ५ वाजता हे आंदोलन होणार आहे. या मोर्चात विविध पक्षांचे नेते सहभागी होण्याची शक्यता असून, त्यांच्या भूमिकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘ठाण्यातून परत जाणार नाही’, नरेश म्हस्केंचा इशारा

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत विरोधकांना इशारा दिला. एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यात येऊन आरोप केल्यास विरोधकांना परत जाता येणार नाही, अशा आशयाचे आक्रमक वक्तव्य त्यांनी केले.

“उद्या ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही. उद्याच्या आंदोलनात चुकीचं वक्तव्य केलं तर तो नेता ठाण्यातून परत जाणार नाही. ही धमकी समजायची असेल तर धमकी समजा,” असे म्हस्के म्हणाले.

‘शिवसेना गप्प बसणार नाही’

पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांना एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून दिला होता, असे म्हस्के यांनी सांगितले. असे असतानाही शिंदे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, यापुढे एकनाथ शिंदे यांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे सांगत, “चुकीच्या पद्धतीने वागणार असाल तर ठोशास ठोसा देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला. कालच्या आंदोलनावेळी संयम राखला; मात्र आता जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मोर्चात ठाकरे गटाचे नेते काय बोलणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण, कारवाईची मागणी आणि नरेश म्हस्के यांनी दिलेला इशारा यामुळे गुरुवारच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चात ठाकरे गटाचे नेते कोणती भूमिका मांडणार आणि म्हस्के यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Inline Article Ad 728x90