22 वर्षांपूर्वीच ओळखली होती विद्यानंद बापटांची गुणवत्ता; उदय सामंतांच्या हस्ते झाला होता गौरव, जुनी कात्रणं व्हायरल

डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या विद्यानंद बापट यांच्या गुणवत्तेची दखल तब्बल 22 वर्षांपूर्वीच रत्नागिरीतील गोळपवासीयांनी घेतली होती. 2004 मध्ये आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बापट यांचा सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जुन्या वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणं आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Vidyanand-Bapat

पुणे : डीजे, डॉल्बी सिस्टीम आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे विद्यानंद बापट हे नाव सध्या पुण्यासह राज्यभर चर्चेत आहे. पुण्यात झालेल्या एका बैठकीत त्यांनी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. त्यानंतर त्यांच्या भूमिकेची राज्यभर चर्चा सुरू झाली. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, विविध विषयांवरील संदर्भ आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळेही बापट चर्चेत आहेत.

मात्र, विद्यानंद बापट यांच्या गुणवत्तेची दखल आज नव्हे, तर तब्बल 22 वर्षांपूर्वीच त्यांच्या मूळ गावातील नागरिकांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील पंचशीलनगरमध्ये 2004 साली झालेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बापट यांचा सत्कार करण्यात आला होता.

उदय सामंतांच्या हस्ते झाला होता गौरव

गोळप येथील आदर्श युवक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

दहावी, बारावी तसेच उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले होते. तत्कालीन मंडळ अध्यक्ष अविनाश काळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. कार्यक्रमाला स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थही उपस्थित होते.

या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत विद्यानंद बापट यांचाही समावेश होता.

पुणे ते रत्नागिरी असा शिक्षणाचा प्रवास

विद्यानंद बापट यांचे नववीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

बी.कॉम.च्या शिक्षणादरम्यान ते महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर आले होते. त्यानंतर त्यांनी एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी सीएची परीक्षाही दिल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे.

लहानपणापासूनच अभ्यास आणि वाचनाची आवड

बापट कुटुंब पुण्यातून कोकणात आल्यानंतर विद्यानंद बापट यांच्या अभ्यासू वृत्तीची दखल शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी घेतली होती. अभ्यास, वाचनाची आवड आणि विविध विषय समजून घेण्याची क्षमता यामुळे ते विद्यार्थी दशेतच लक्ष वेधून घेत होते.

याच पार्श्वभूमीवर 2004 मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

जुन्या वृत्तपत्रांची कात्रणं सोशल मीडियावर व्हायरल

गोळप येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमाच्या बातम्या आणि छायाचित्रे त्यावेळी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती. आता याच जुन्या बातम्यांची कात्रणं आणि फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत.

या कात्रणांमुळे विद्यानंद बापट यांच्या विद्यार्थी दशेतील गुणवत्तेची आणि अभ्यासू वृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पुण्यात ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेल्या बापट यांचं मूळ गाव गोळपही त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

Inline Article Ad 728x90