अमित शाहांनी राजीनामा द्यावा; अभिजीत दीपकेंची थेट मागणी
कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील कथित गोळीबार, पक्षाला परदेशातून निधी मिळत असल्याच्या आरोपांवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, दिल्ली पोलिस आणि भाजपवरही टीका केली. मात्र, दीपके यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप केंद्र सरकार किंवा संबंधितांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबारासाठी अमित शाह जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पक्षाला परदेशातून निधी मिळत असल्याच्या आरोपांवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले.
माध्यमांशी बोलताना दीपके म्हणाले, "आमच्या पक्षाला बाहेरून निधी मिळतो, असा आरोप केला जातो. पण अमित शाह गृहमंत्री असताना हे शक्य कसं झालं? जर तसं होत असेल, तर ते गृहमंत्रालयाचं अपयश आहे. त्यामुळे अमित शाह यांनी राजीनामा द्यावा."
धर्मेंद्र प्रधानांवर टीका
दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही टीका केली. "जेन-झी पिढीला ट्रोल करून काहीच मिळणार नाही. हीच मुलं उद्या देश चालवणार आहेत. सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला हवं," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शेतकरी नेत्यांचे आभार मानत, "मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू," असेही सांगितले.
"मी भाजपमध्ये जाणार नाही"
भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याचा दावा करत दीपके म्हणाले, "मला कितीही ऑफर आली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. मला धमक्या दिल्या जात आहेत, पण मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही."
याशिवाय 2014 नंतर देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
दिल्ली पोलिसांवरही आरोप
आंदोलनादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत दीपके म्हणाले, "आमच्या आंदोलनावेळी सर्वत्र कॅमेरे होते. पोलिसांनी संविधानानुसार काम करावं. तसे शक्य नसेल तर त्यांनी गणवेश काढून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करावं."
तसेच आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दगडांनी भरलेला ट्रक आणण्यात आला होता आणि नंतर विद्यार्थ्यांवर दोष टाकण्याचा प्रयत्न झाला, असाही दावा त्यांनी केला.
अधिकृत प्रतिक्रिया नाही
अभिजीत दीपके यांनी केलेल्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्र सरकार, भाजप, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान किंवा दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. मात्र, दीपके यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात या मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे.