शिक्षकाच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच! रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा PA एसीबीच्या जाळ्यात; ३ दिवसांची पोलीस कोठडी

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश भस्मे यांना शिक्षकाच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. न्यायालयाने भस्मे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Raigad Crime

रायगड : रायगड जिल्हा परिषदेत लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. एका शिक्षकाच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. बुधवारी (२३ सप्टेंबर) झालेल्या या कारवाईनंतर भस्मे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


शिक्षकाच्या बदलीसाठी दीड लाखांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शिक्षक असलेल्या पत्नीची बदली करून देण्यासाठी योगेश भस्मे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार, ठरलेली दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना भस्मे यांना रंगेहात पकडण्यात आले. भस्मे हे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात कार्यरत असून, अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळत होते.


जिल्हा परिषद अध्यक्षांची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी?

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाला लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणात वाकडीकर यांचा काही संबंध आहे का, याचाही संबंधित अधिकारी तपास करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांचा सहभाग असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही.


आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

अटकेनंतर योगेश भस्मे यांना गुरुवारी (२४ सप्टेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या लाचखोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Inline Article Ad 728x90