वृद्धाश्रमात पहाटे रक्तरंजित थरार! झोपेत असलेल्या वृद्धांवर लोखंडी रॉडने हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

अहिल्यानगरमधील विळद घाट परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात एका वृद्धाने झोपेत असलेल्या सहकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन वृद्धांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सतत चिडवल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय असून पोलिसांनी आरोपी राजू घुले याला ताब्यात घेतले आहे.

Ahilyanagar_Crime

अहिल्यानगर : वृद्धापकाळात सुरक्षित आसरा मिळावा म्हणून वृद्धाश्रमात दाखल झालेल्या नागरिकांवरच जीवघेणा हल्ला झाल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. शहराजवळील विळद घाट परिसरातील प्रसिद्ध मातोश्री वृद्धाश्रमात एका वृद्धाने झोपेत असलेल्या सहकारी वृद्धांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेमुळे वृद्धाश्रमात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या राजू घुले याने पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इतर वृद्ध झोपेत असताना त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घुले याला ताब्यात घेतले असून हल्ल्यासाठी वापरलेला लोखंडी रॉडही जप्त केला आहे.

हात थरथरत असल्यावरून चिडवल्याचा राग; झोपेतच केला हल्ला?

प्राथमिक माहितीनुसार, राजू घुले याचा उजवा हात सतत थरथरत होता. यावरून वृद्धाश्रमातील इतर सहकारी त्याला चिडवत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच राग मनात धरून त्याने सहकारी वृद्धांवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पहाटे सहाच्या सुमारास इतर वृद्ध झोपेत असताना त्याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि पायांवर वार केल्याचे समोर आले आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दोन वृद्धांचा मृत्यू; सहा जण रुग्णालयात

या हल्ल्यात मंकाळेश्वर हेणे आणि दत्तात्रेय हारके या दोन वृद्धांचा मृत्यू झाला. तर गणेश घोडके, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, साहेबराव भवर, लिंबराज फिसके आणि संतोष पिरगल हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे.

बहीण घेण्यासाठी येत असतानाच घडली घटना

राजू घुले हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी (कुंभारी) येथील रहिवासी असून तो अविवाहित आहे. त्याचा भाचा प्रयाग सानप याने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याला मातोश्री वृद्धाश्रमात दाखल केले होते.

विशेष म्हणजे, घुले याला वृद्धाश्रमातून त्याच्या बहिणीकडे पाठवण्यात येणार होते. त्याची बहीण त्याला घेण्यासाठी नाशिकहून अहिल्यानगरकडे येत होती. मात्र, ती पोहोचण्यापूर्वीच ही घटना घडली.

एमआयडीसी पोलिसांकडून पुढील तपास सुरू

वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90