तोफखाना हद्दीत नशेचे आणि अवैध धंदे पुन्हा सक्रिय; नागरिकांमध्ये संताप

अहिल्यानगरच्या तोफखाना हद्दीत नशेचे आणि अवैध धंदे पुन्हा वाढल्याचा आरोप होत असून, व्हायरल व्हिडिओंमुळे संताप वाढला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगारीवर ठोस नियंत्रण न बसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

drugs image

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेचे आणि अवैध धंदे पुन्हा वाढल्याचा आरोप होत असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे खळबळ उडाली आहे. बोल्हेगाव, तपोवन रोड आणि आसपासच्या परिसरात उघड्यावर चालणारे अंमली पदार्थांचे अड्डे, भाईगिरी आणि अवैध व्यवसाय पुन्हा सक्रिय झाल्याचा दावा नागरिक आणि व्यापारी करत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात छुप्या स्वरूपात सुरू असलेले अड्डे आणि गुन्हेगारी टोळ्या पुन्हा डोके वर काढताना दिसत आहेत. वेळेत आणि कडक कारवाई न झाल्याने पोलिसांचा वचक कमी झाला का, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. काही व्हिडिओंमध्ये दिसणारे प्रकार हे परिसरातील वाढत्या बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे निदर्शक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तोफखाना पोलिसांनी बोल्हेगाव परिसरातील सहा गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून टपऱ्या उद्ध्वस्त केल्या, तसेच तपोवन रोड परिसरातही कारवाई केली. ही कारवाई दिलासा देणारी असली तरी, अवैध धंद्यांचे मूळ उद्ध्वस्त करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्याची गरज स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस दलातीलच काही घडामोडींमुळेही संशयाची छाया गडद झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्याने खाकी वर्दीवरील विश्वासाला धक्का बसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे केवळ बाहेरील टोळ्यांवरच नव्हे, तर आतूनही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.

व्यसनाधीनता, भाईगिरी आणि वाढत्या अवैध धंद्यांविरोधात नागरिक, व्यापारी आणि राजकीय संघटनांनी याआधीही आवाज उठवला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे, आंदोलने आणि कठोर कारवाईची मागणी यामुळे हा प्रश्न जिल्ह्यातील गंभीर विषय बनला आहे. प्रशासनानेही अमली पदार्थ आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

तोफखाना हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर केवळ छाप्यांनी नव्हे, तर सातत्यपूर्ण चौकशी, गस्त वाढवणे आणि नेटवर्क उध्वस्त करणारी मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

Inline Article Ad 728x90