कामशेतमध्ये खळबळ! हायवे ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून ₹५ लाखांच्या खंडणीचा प्रयत्न
कामशेतमध्ये हायवे ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून ₹५ लाखांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ड्रग्जचा खोटा आरोप करून प्रवाशांना धमकावल्याप्रकरणी ६ पैकी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुणे : मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर तळेगावकडे जाणाऱ्या एका कारमधील प्रवाशांना अडवून, ड्रग्ज असल्याचा खोटा आरोप करत ₹५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ जणांची ओळख पटली असून त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींमध्ये हायवे ट्रॅफिक पोलीस मदत केंद्र, खंडाळा येथे कार्यरत कर्मचारी आणि वॉर्डन यांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार श्री. भूषित उमेश शर्मा हे त्यांच्या तीन मित्रांसह पुण्याकडून लोणावळ्याकडे जात असताना मावळ तालुक्यातील ताजे गावच्या हद्दीत अंबर दिवा लावलेल्या झायलो कारने त्यांची गाडी अडवण्यात आली. यावेळी हायवे ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश घातलेल्या सहा जणांनी गाडीतील लोकांकडे अंमली पदार्थ असल्याचा आरोप करत कारवाईची धमकी दिली आणि ती टाळण्यासाठी ₹५ लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे.
पुढे आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी तळेगाव दिशेने नेले. मात्र, तिकडे पोहोचल्यावर पीडितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला संशय आल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर कामशेत पोलीस ठाण्यात बीएनएसच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासानुसार, या प्रकरणातील सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यामध्ये पोलीस नाईक अमोल वाईकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल नन्नवरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार ढवळे, तसेच किसन बोम्बले, नितेश चव्हाण आणि तुषार घाडगे यांचा समावेश आहे. यापैकी पाच जणांना अटक झाली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात येणार आहे.
ही घटना समोर आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आणि हायवेवरील पोलिसांच्या वर्तनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटनासाठी लोणावळ्याकडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून अशा प्रकारे खंडणी मागण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे