अमित साटम यांचं ठाकरेंना थेट आव्हान; “कपडे फाडायला दोन मिनिटंही लागणार नाहीत”, नेमकं काय म्हणाले?
मुंबईतील एका कार्यक्रमात भाजप नेते अमित साटम यांनी ठाकरे बंधूंसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपासून मराठी शाळेतील प्रवेश, कंत्राटदारांच्या बिलांपासून मैदानांच्या मुद्द्यापर्यंत साटम यांनी अनेक आरोप करत थेट आव्हान दिलं. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
.webp)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची चिन्हं दिसत आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात भाजप नेते अमित साटम यांनी ठाकरे बंधूंसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपासून मुंबईतील मैदानं, कंत्राटदारांची बिलं आणि मराठी शाळेतील प्रवेशाच्या मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जात असल्याचा दावा करत साटम यांनी 2029 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची झाल्यास महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची असेल, असं म्हटलं. मात्र, हे अनेकांना बघवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
“कपडे फाडायला आम्हाला दोन मिनिटं लागणार नाहीत”
विरोधकांवर टीका करताना अमित साटम यांनी थेट इशारा दिला. मुंबई महापालिकेतील मैदानं आणि कंत्राटदारांच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना जुने हिशोब तपासण्याचं आवाहन केलं.
“तुम अपने गिरेबान में झांक के देखो,” असं म्हणत साटम यांनी मुंबई महापालिकेत सत्तेत असताना कोणत्या नेत्यांना आणि आमदारांना मैदानं देण्यात आली, याची यादी आपल्याकडे असल्याचा दावा केला.
कंत्राटदारांच्या बिलांवरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. केवळ गुजराती कंत्राटदारांची बिलं निघतात आणि मराठी कंत्राटदारांची बिलं निघत नाहीत, असा आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी काही नावांचा उल्लेख केला.
“जर अशा प्रकारे वागणार असाल, तर तुमचे कपडे फाडायला आम्हाला दोन मिनिटंही लागणार नाहीत,” असं अमित साटम म्हणाले.
“मराठीचा इतका कळवळा असेल तर नातवाचं ॲडमिशन घेऊन दाखवा”
याच भाषणात साटम यांनी ठाकरे यांच्यावर आणखी एक थेट निशाणा साधला. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवावी, असं आव्हान त्यांनी दिलं.
“तुमच्या नातवाचं अॅडमिशन बालमोहन विद्यामंदिरच्या मराठी शाळेत घेऊन दाखवा,” असं आव्हान अमित साटम यांनी दिलं.
“नुसत्या मराठीच्या बाता नाही करायच्या,” असं म्हणत त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे यांना लक्ष्य केलं.
विरोधकांवर ‘अँटी इंडिया फोर्सेस’चा आरोप
अमित साटम यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर गंभीर राजकीय आरोपही केले. ठाकरे बंधू, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधक हे ‘अँटी इंडिया फोर्सेस’सोबत हातमिळवणी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“हे षडयंत्र भाजपला नाही, तर भारताला थांबवण्याचं आहे,” असा दावा साटम यांनी केला.
भारताला पुढे जायचं असेल तर भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना थांबवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, अमित साटम यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.