अमरावती रुग्णालयातील आगीवरून राजकारण तापलं; चित्रा वाघांचा संताप, यशोमती ठाकूर म्हणाल्या ‘पर्यटन बंद करा, नाटकं बंद करा’

अमरावतीच्या शासकीय स्त्री रुग्णालयातील भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या रुग्णालय भेटींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णालयाची पाहणी करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी नेत्यांच्या दौऱ्यांना ‘पर्यटन’ म्हणत सरकारवर जोरदार टीका केली. फायर ऑडिट, अलार्म बंद असणे, अँब्युलन्ससाठी डिझेलचा प्रश्न आणि रुग्णालयातील असुविधांवरून आता दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

Yashomati Thakur_ Chitra Wagh

अमरावती : अमरावतीच्या शासकीय स्त्री रुग्णालयातील भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी मंत्री, आमदार आणि खासदारांकडून दौरे सुरू झाले आहेत. मात्र, या दौऱ्यांवरूनच आता राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी अमरावतीतील शासकीय स्त्री रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करत असुविधांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. “तुमच्यामुळे सरकार बदनाम होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला सुनावलं.

मात्र, चित्रा वाघ यांच्या पाहणीनंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट देणाऱ्या नेत्यांवरच जोरदार टीका केली. नेत्यांचे हे दौरे म्हणजे ‘पर्यटन’ असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

“दवाखान्यात पर्यटनासारखे येत आहेत आणि तमाशा जास्त करत आहेत. कुठेही सरकार काम करत नाही. सरकारचा धाक इथे राहिलेला नाही,” अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला.

‘121 कोटी दिले, पण रुग्णालयाला 9 कोटी नाहीत?’

यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अनुपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केले. हनुमान गढीसाठी 121 कोटी रुपये दिले, मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी 9 कोटी रुपये दिले नाहीत, असा दावा करत त्यांनी सरकारवर टीका केली.

“इथे येऊन उगाच नाटकं आणि आरडाओरडा बंद करा. रोज कोणी हिरो-हिरोईनसारखं किंवा लोकप्रतिनिधी येणार आणि सरकार काम करत असल्याचं सांगणार. मात्र, अमरावतीकडे सरकारचं दुर्लक्ष आहे,” असा आरोप ठाकूर यांनी केला.

चित्रा वाघांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

दरम्यान, चित्रा वाघ यांनी रुग्णालयातील आगीच्या घटनेबाबत जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भंडारा दुर्घटनेनंतर सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अमरावती रुग्णालयाच्या फायर ऑडिटबाबत प्रशासनाच्या दाव्यांमध्येच विसंगती असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

PWD अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 25 जून, 30 जून आणि 22 ऑगस्ट रोजी रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशी पाहणी झालीच नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही कोणीतरी खोटं बोलत असल्याचं मान्य केल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला.

यामुळे आता नेमकं खोटं कोण बोलतंय? फायर ऑडिट खरंच झालं होतं का? आणि दुर्घटनेपूर्वी सुरक्षेच्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘दोषींना माफी नाही’

या प्रकरणात शासनाने समिती नेमली असून चौकशीत दोषी कोण हे समोर येईल. मात्र, या घटनेत पोलिस चौकशीही आवश्यक असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

“तीन नवजात बालकांचा जीव गेला आहे. जे जे दोषी असतील ते निलंबित झाले पाहिजेत. त्यांना माफी नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.

36 बालकांचा जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक

आगीची घटना घडली त्यावेळी रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत 36 बालकांचा जीव वाचवल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं. तसेच तीन नवजात बालकांना खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अलार्म बंद का केले? अँब्युलन्समध्ये डिझेलचा प्रश्न

रुग्णालयातील फायर अलार्मबाबतही गंभीर बाब समोर आली आहे. वारंवार अलार्म वाजत असल्याने रुग्णालय प्रशासनाने अलार्म बंद केले होते आणि त्यानंतर प्रत्यक्ष आग लागली, असा दावा वैद्यकीय अधीक्षकांनी केल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

याशिवाय आगीच्या घटनेनंतर अँब्युलन्समध्ये डिझेल नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. निधी उपलब्ध असूनही रुग्णालयाकडून दर्जेदार सेवा मिळत नसेल, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवालही उपस्थित झाला आहे.

आता शासनाच्या समितीच्या चौकशीत नेमक्या कोणत्या त्रुटी समोर येतात आणि तीन नवजात बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Inline Article Ad 728x90