भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात नरेंद्र पवारांना धक्का; अटकपूर्व जामीन फेटाळला, आता अटकेची शक्यता
भिवंडीतील कथित सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

सत्र न्यायालयाचा नरेंद्र पवारांना धक्का
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कथित सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भिवंडी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पवार यांच्यासह बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद, तसेच फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांची बाजू विचारात घेण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस पुढे कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
मदतीच्या बहाण्याने फार्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, वैयक्तिक अडचणीत मदत करण्याच्या बहाण्याने तिला कल्याणमधून भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने मद्य पाजण्यात आले आणि तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या तक्रारीच्या आधारे १७ सप्टेंबर २०२६ रोजी पडघा पोलीस ठाण्यात नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षातील सर्व पदांचा राजीनामा
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर नरेंद्र पवार यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. यासंदर्भात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्रही पाठवले.
दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष
या प्रकरणात नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने आता पुढील तपास आणि संभाव्य अटकेच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.