भुसावळमध्ये शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू; मुलीच्या साखरपुड्यापूर्वी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुसरी गावाच्या शिवारात शेतात काम करताना विजेचा धक्का लागून अशोक बाबूराव पाटील (५५) आणि सरीता अशोक पाटील (४३) या पती-पत्नीचा मृत्यू झाला. शेतातील विद्युत खांबावरील तुटलेली तार गवतात पडली होती. तिच्या संपर्कात आल्याने प्रथम अशोक पाटील यांना विजेचा धक्का बसला. पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या सरीता पाटील यांनाही विजेचा धक्का बसला. दोघांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. येत्या १ नोव्हेंबरला त्यांच्या मुलीचा साखरपुडा होणार होता. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वरणगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-2.jpg)
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुसरी गावाच्या शिवारात शेतात काम करताना विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरीता अशोक पाटील (वय ४३) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. येत्या १ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीचा साखरपुडा होणार होता. मात्र, या आनंदाच्या क्षणापूर्वीच काळाने घाला घातल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतातील तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि सरीता पाटील हे मजुरांसह सुसरी गावच्या शिवारातील गट क्रमांक १२८/१ मधील स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतात कांद्याची लागवड करण्यात आली असून निंदणी आणि खुरपणीचे काम सुरू होते. याचदरम्यान शेतातील विद्युत खांबावरील तार तुटून गवतात पडलेली होती.
या तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने अशोक पाटील यांना जोरदार विजेचा धक्का बसला. पतीला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी सरीता पाटील त्यांच्या जवळ गेल्या. मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुर्दैवी घटना
दोघांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.
मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अशोक पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. घरात साखरपुड्याची तयारी सुरू होण्याची वेळ असतानाच या दुर्घटनेमुळे कुटुंबाचा आनंद क्षणात दुःखात बदलला. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी तिच्या पाठीशी उभे राहणारे आई-वडीलच हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि आई असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार हरपल्याने पाटील कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची वरणगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्युत तार नेमकी कोणत्या कारणामुळे तुटून खाली पडली, याचा तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सुसरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.