वादळी पावसात शेतातील झोपडीत घेतला आसरा अन् क्षणात घडलं भयंकर; संभाजीनगरमध्ये पाच जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी वादळी पावसादरम्यान वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर कन्नड तालुक्यातील पिशोर येथे तीन महिलांनी जीव गमावला.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. अनेक भागांत खरीपाची पिके करपण्याच्या मार्गावर असतानाच गुरुवारी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, हा पाऊस काही कुटुंबांसाठी मोठी दुर्घटना घेऊन आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
शेतातील झोपडीत आसरा घेतला, पण...
सिल्लोड तालुक्यातील दहिगाव परिसरात वादळी पाऊस सुरू झाल्यानंतर शेतात असलेल्या पती-पत्नीने एका झोपडीत आसरा घेतला होता. त्याचवेळी झोपडीवर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधला. पती-पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
पिशोरमध्ये तीन महिलांचा मृत्यू
दरम्यान, कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातही वीज पडण्याची आणखी एक गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला. दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एकाच दिवशी जिल्ह्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालन्यात जोरदार पावसाची हजेरी
दुसरीकडे, जालना शहरासह परिसरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला.
जालना तालुक्यासह अंबड तालुक्यातील काही गावांमध्येही पाऊस झाल्याची माहिती आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपू लागल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोकळ्या जागेत, झाडाखाली किंवा धोकादायक ठिकाणी थांबणे टाळून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.