गणपतीसाठी कोकणात निघाले अन् वाटेतच घडलं भयंकर! राजापूरमध्ये वाहनाचा भीषण अपघात; 8 ते 10 जण गंभीर

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणातील गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाला रत्नागिरीतील राजापूर येथे भीषण अपघात झाला. वाहनात सुमारे 15 प्रवासी असल्याची माहिती असून त्यापैकी आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Ratnagiri Accident

रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणातील आपल्या गावी जाण्याचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच रत्नागिरीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांच्या वाहनाला राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. अपघातानंतर वाहनाची झालेली अवस्था पाहून धडकी भरावी, अशी परिस्थिती घटनास्थळी होती.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर फोर्स अर्बेनिया वाहनाचा अपघात झाला. या वाहनातून जवळपास 15 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवासी मालवणमधील असल्याची माहिती

हे प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे गावातील असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी हे सर्वजण मुंबईहून आपल्या गावी निघाले होते.

मात्र, गाव गाठण्याआधीच राजापूर परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि काही क्षणांत आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर भीषण दुर्घटनेत झाले.

स्थानिक तरुणांनी धाव घेत केली मदत

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना वाहनातून बाहेर काढत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

राजापूर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून अपघात नेमका कसा झाला, वाहनावरील नियंत्रण सुटले होते का किंवा अन्य कोणते कारण होते, याचा तपास सुरू आहे.

सुदैवाने या घटनेत अद्याप कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे चाकरमान्यांची मोठी गर्दी

सोमवार, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने मुंबई, पुणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या गावी रवाना झाले आहेत.

कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्याने दरवर्षी लाखो नागरिक सणासाठी गावी परततात. यंदाही महामार्ग, रेल्वे आणि एसटी बसमधून मोठ्या प्रमाणावर प्रवास सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

चाकरमान्यांच्या वाढत्या गर्दीचा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर दिसून येत आहे. इंदापूर आणि माणगावसह काही भागांत मोठी वाहतूक कोंडी होत असून काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोकणाकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांनाही विलंब होत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह असताना दुसरीकडे राजापूरमधील या भीषण अपघातामुळे गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Inline Article Ad 728x90