पुणे-बेंगळुरू महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; ट्रकची धडक अन् काही क्षणांत चार वाहनांचा चुराडा, दोघांचा मृत्यू
पुणे-बेंगळुरू महामार्गावरील जांभुळवाडी परिसरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. एका अशोक लेलँड ट्रकने पुढील आयशर टेम्पोला धडक दिल्यानंतर वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत गेली आणि एर्टिगा व टाटा अल्ट्रोजला धडकली. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या काही क्षणांत भीषण अपघाताची मालिका घडली. साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकने पुढील वाहनाला दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की त्यानंतर दोन ट्रक आणि दोन कार एकमेकांवर आदळल्या. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 12 जण जखमी झाले आहेत.
ही घटना रविवारी, 13 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12.10 वाजता आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ, लक्ष्मी लॉजसमोर घडली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 09 सीयू 7828 क्रमांकाचा अशोक लेलँड ट्रक साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येत होता. यावेळी ट्रकने समोरून त्याच दिशेने जाणाऱ्या एमएच 11 सीएच 9007 क्रमांकाच्या आयशर टेम्पो ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर दोन्ही मालवाहू वाहने नियंत्रणाबाहेर गेली. ती लेन सोडून मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेत गेली आणि समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी एर्टिगा तसेच टाटा अल्ट्रोज कारला धडकली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की आयशर ट्रक, एर्टिगा आणि अल्ट्रोज या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनांमधील चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
अपघातानंतर जखमींना तातडीने परिसरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला.
मृतांची नावे –
हृदयनाथ मोहन गायकवाड (वय 47), रा. मेघवाडी पोलीस ठाण्याजवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई.
आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय 50), रा. सेक्टर 10, नेरूळ, नवी मुंबई.
या दुर्घटनेत एकूण 12 जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमींवर भारती हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, सिल्वर बर्च हॉस्पिटल आणि श्रेयस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर महामार्गावर गोंधळ
एकाच वेळी अनेक वाहने अपघातग्रस्त झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ट्रक चालकासह मालकाविरोधात गुन्हा
याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात CR No. 392/2026 अंतर्गत BNS कलम 105, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक लेलँड ट्रकचा चालक प्रमोद विठ्ठल वाघ (वय 40, रा. खटाव, जि. सातारा) आणि ट्रक मालक संदीप गोरख सूर्यवंशी (वय 45, रा. खटाव, जि. सातारा) यांच्याबाबत पोलिसांनी कारवाई सुरू केली असून वाहन मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याबाबत आंबेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.