ताफा अडवला, हातात काजू-बदाम दिले अन् घोषणाबाजी सुरू; कृषिमंत्री भरणेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली ‘ही’ मोठी तक्रार

हिंगोली जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार एका गावातील शेतकऱ्यांनी केली, तर टाकळगाव परिसरात काही शेतकऱ्यांनी भरणे यांचा ताफा अडवत त्यांना काजू-बदाम देऊन निषेध नोंदवला.

Dattatray-Bharane

हिंगोली : राज्यातील अनेक भागांत पुरेशा पावसाअभावी शेतीसमोरील संकट गंभीर होत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. सोयाबीनसह विविध पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र, या दौऱ्यादरम्यान कर्जमाफीपासून ते दुष्काळी मदतीपर्यंत अनेक मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली.

‘आमच्या गावात कोणालाच कर्जमाफीचा लाभ नाही’

हिंगोली जिल्ह्यातील बोराळा येथे कृषिमंत्री भरणे यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. सरकारकडून कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या असल्या तरी आपल्या गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी केली.

या तक्रारीवर बोलताना दत्तात्रय भरणे यांनी आणखी एक यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले. त्या यादीत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

बांधावरच भाजी-भाकरीचे जेवण

दौऱ्यादरम्यान हिवरा परिसरात पिकांची पाहणी झाल्यानंतर कृषिमंत्री भरणे यांनी शेताच्या बांधावरच जेवण केले. भाजी-भाकरीचा आस्वाद घेताना त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारीही उपस्थित होते.

ताफा अडवला अन् हातात दिले काजू-बदाम

दरम्यान, टाकळगाव परिसरातील पाहणीवेळी दौऱ्याला वेगळे वळण मिळाले. काही संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्री भरणे यांचा ताफा अडवत काजू-बदाम देऊन निषेध नोंदवला. नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम ठेवण्यात आल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निषेध करण्यात आला.

यावेळी आंदोलकांकडून ‘काजू-बदाम खायेंगे, दुष्काळ पाहणी करेंगे’ अशा घोषणा देण्यात आल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह काही शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

दुष्काळ जाहीर करा, तातडीने मदत द्या

शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घ्यावेत आणि आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या केल्या. अचानक ताफा अडवण्यात आल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून कृषिमंत्र्यांचा ताफा पुढे रवाना केला.

पावसाच्या तुटीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने हिंगोलीसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी अधिक तीव्र होत असल्याचे या दौऱ्यात दिसून आले.

Inline Article Ad 728x90