अरुणाचल सीमेवर तणाव वाढला, चीनने भारताला नेमकं काय सुनावलं?
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये समोरासमोर येण्याच्या घटनांवरून तणाव वाढल्याची चर्चा सुरू असतानाच चीनने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सीमावर्ती भागात नियमित गस्त घातली जात असल्याचे सांगत भारतानेही द्विपक्षीय करारांचे पालन करून शांतता राखण्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (ITBP) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये समोरासमोर येण्याच्या घटना सुरू असल्याचे सांगितल्यानंतर या मुद्द्याला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर चीनने आपली बाजू मांडत सीमावर्ती भागातील गस्त नियमित असल्याचा दावा केला आहे.
चीनने नेमकं काय म्हटलं?
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी (२६ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत भारत-चीन सीमाप्रश्नावर भाष्य केले. चीन दोन्ही देशांमधील करार आणि सहमतीचे काटेकोर पालन करत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच प्रादेशिक सार्वभौमत्व आणि सीमावर्ती भागातील स्थैर्य टिकवण्यासाठी चिनी सैन्याकडून नियमित गस्त घातली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर संवाद सुरू असल्याचे सांगत भारतानेही परस्पर सहमतीची अंमलबजावणी करावी आणि सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ITBP महासंचालकांच्या विधानानंतर खळबळ
ITBP चे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी २२ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक समोरासमोर आल्याचे सांगितले होते. काही ठिकाणी अशी परिस्थिती अद्याप कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले. या घटनांमध्ये भारतीय जवानांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळल्याचे सांगत त्यांनी 'शौर्य कमांडो' पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले.
त्यांच्या या विधानानंतर देशातील राजकीय वातावरणही तापले असून विरोधकांनी केंद्र सरकारकडे सीमावर्ती परिस्थितीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
भारतानेही मांडली स्पष्ट भूमिका
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी २३ ऑक्टोबर रोजी चीनच्या सैनिकांकडून निर्धारित गस्तीच्या पद्धतींमध्ये बदल झाल्यास सीमेवरील परिस्थिती बिघडत असल्याचे सांगितले होते.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) मतभेद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि लष्करी स्तरावर संवाद सुरू असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखणे अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका भारताने पुन्हा अधोरेखित केली आहे.