दिल्लीतील महिला ड्रग्ज तस्कराच्या घरात नोटांचा ढीग! 56 लाखांची रोकड, 355 ग्रॅम सोनं जप्त; राजस्थानपर्यंत पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत बावाना येथील महिला आरोपी पार्वतीच्या घरातून तब्बल 56.69 लाख रुपयांची रोकड, 355 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 161 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणात पार्वतीसह तिचा अंगरक्षक आणि राजस्थानमधील कथित ड्रग्ज पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे. दिल्लीपासून राजस्थानपर्यंत पसरलेल्या आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याचा पोलीस तपास करत आहेत.

Delhi_Drugs Racket_Crime

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; महिला ड्रग्ज तस्करी प्रकरणात लाखोंची रोकड जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बावाना परिसरात मोठी कारवाई करत अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित असल्याचा संशय असलेली लाखो रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात पार्वती नावाच्या महिलेसह तिचा अंगरक्षक विकास उर्फ शानू याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात राजस्थानपर्यंत पसरलेल्या अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीची माहिती समोर आली असून, आणखी एका संशयित पुरवठादारालाही अटक करण्यात आली आहे.

घर आणि लॉकरची झडती घेताच सापडली 56 लाखांची रोकड!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावाना येथील जे.जे. कॉलनीमधील पार्वतीच्या घराची आणि लॉकरची झडती घेण्यात आली. या कारवाईत 56 लाख 69 हजार रुपयांची रोकड, 355 ग्रॅम सोन्याचे दागिने, 161 ग्रॅम चांदीचे दागिने आणि मालमत्तेशी संबंधित नोंदणीची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

ही संपत्ती अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून जमा करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. जप्त केलेली रोकड, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे नरेला पोलीस ठाण्याच्या कोठारात जमा करण्यात आली आहेत.

पहिल्याच छाप्यात 939 ग्रॅम हेरॉईन आणि लाखोंची रोकड

बावाना येथील न्यू सनोथ कॉलनीमधील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर पोलिसांनी सुरुवातीला छापा टाकला होता. या कारवाईत नियाजची पत्नी पार्वती आणि तिचा अंगरक्षक विकास उर्फ शानू यांना अटक करण्यात आली.

आरोपींच्या ताब्यातून 939 ग्रॅम हेरॉईन, 615 ग्रॅम भेसळयुक्त पावडर आणि 7 लाख 93 हजार 170 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पार्वतीच्या मालमत्तेची अधिक चौकशी सुरू केली.

दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे?

पोलिसांच्या चौकशीत पार्वती दीर्घकाळापासून दिल्लीतील बावाना आणि नरेला परिसरात अमली पदार्थांच्या पुरवठ्यात सक्रिय असल्याची माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

राजस्थानमधून दिल्लीमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याची माहितीही तपासात समोर आली. पार्वती संघटित आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीचे जाळे चालवत असल्याचा पोलिसांचा संशय असून, या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे.

राजस्थानमधील पुरवठादारालाही अटक; कारमधून 265 ग्रॅम हेरॉईन जप्त

या प्रकरणाचा तपास पुढे नेत पोलिसांनी राजस्थानमधील प्रतापगड येथील 37 वर्षीय साहेब खान उर्फ सोनू याला अटक केली आहे. साहेब खान हा पार्वतीला अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

गोरधनपुरा येथील रहिवासी असलेला साहेब खान हा फिझा हॉटेल अँड रेस्टॉरंटचा मालक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या स्विफ्ट कारमधून 265 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, MP-14-CA-8134 क्रमांकाची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

एकूण 1.204 किलो हेरॉईन आणि 64 लाखांहून अधिक रोकड जप्त

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एकूण 1 किलो 204 ग्रॅम हेरॉईन, सुमारे 64.62 लाख रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन कार जप्त केल्याचे वृत्त आहे.

आणखी किती मालमत्ता? पोलिसांकडून बँक खात्यांची चौकशी

पार्वतीने अमली पदार्थांच्या तस्करीतून आणखी किती मालमत्ता जमा केली आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी चार भूखंड आणि एका घराशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली असून, संशयित आर्थिक व्यवहार आणि संबंधित बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे.

दिल्ली आणि राजस्थानमधील या कथित तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Inline Article Ad 728x90