संजय राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'मी महाराष्ट्र सोडणार नाही'

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा रंगली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस यांनी "मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे," असे स्पष्ट करत केंद्रात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न पक्षीय नसून देशाच्या तरुणाईचे असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचे समर्थन केले. ठाकरे बंधूंच्या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर देत मोदींना देशाचा व्यापक पाठिंबा असल्याचा दावा केला.

Devendra Fadnavis Image

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. मात्र, नेमकी कोणाशी चर्चा झाली आणि दौऱ्याचा उद्देश काय होता, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय शिक्षणमंत्रीपदी नियुक्ती होऊ शकते, असा दावा केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.

या सर्व चर्चांवर अखेर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. "मी आज नागपुरात आहे. संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे," असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी दिल्लीला जाणार असल्याच्या आणि केंद्रात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मुंबईतील तिरंगा रॅलीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचा आनंद साजरा करत केंद्र सरकारवर टीका केली होती. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,भविष्य सुरक्षित राहावे यासाठी केंद्र सरकार कठोर कायदा आणत आहे. असा कठोर कायदा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात क्वचितच झाला असेल. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो."

ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारचे डायलॉग ते गेल्या अनेक वर्षांपासून बोलत आहेत. त्याचा कोणावरही परिणाम होत नाही. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. रात्री एक वाजता प्रसिद्ध झालेल्या मोदींच्या व्हिडिओने इंस्टाग्रामवर विक्रमी प्रतिसाद मिळवला, यावरूनच जनतेचा पाठिंबा स्पष्ट होतो."

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात विराम मिळाला असला, तरी आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Inline Article Ad 728x90